मुंबई येथे दूध प्रश्नाबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बैठक- Advertisement -
जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी, डेअरी चालक व प्लांट चालकांची माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी घेतली बैठक
दूधवालाच दूध उत्पादकांना न्याय देणार – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले
नगर : राज्यातील दूध प्रश्नाबाबत मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 29 जून रोजी बैठकीचे आयोजन केले आहे या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील उपस्थित राहणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मला देण्यात आले आहे कारण दुधाबाबतचे प्रश्न मला माहित आहे ते मी उद्या मांडणार असून सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना दहा रुपयाचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करा तसेच जाचक अटी व केंद्र सरकारने घालून दिलेली अट रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी डेअरी चालक व प्लांट धारकांच्या आयोजित बैठकीत दिली, या बैठकीला जिल्हाभरातील उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बैठकीत बोलताना म्हणाले की, दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा जोडधंदा असून उदरनिर्वाह करण्याचे साधन आहे मात्र दूधभावा संदर्भात शेतकरी सरकारवर नाराज आहे सरकारने ५ टक्के अनुदान जानेवारी महिन्यातच जाहीर केले होते मात्र जाचक अटी शर्तीमुळे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकले नाही फक्त 40 टक्केच दूध उत्पादकांना लाभ झाला आहे पण उर्वरित ६० टक्के शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचलीच नाही, मंत्रालय स्तरावर सरकार निर्णय घेत असताना ग्रामीण भागातील प्रश्न समजून घेण्याची खरी गरज आहे, मात्र अधिकारी वर्ग मंत्रालयात बसूनच निर्णय घेत असतात, त्यामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नाही त्यामुळे सरकारवर नागरिकांचा रोष निर्माण होत असतो दोन लिटर दूध उत्पादकापासून तर थेट 100 लिटर दूध उत्पादकापर्यंत सर्वांनाच शासनाच्या अनुदानाची मदत होणे गरजेचे आहे, यासाठी उद्या मुंबईत होणाऱ्या दूध प्रश्नाबाबतच्या बैठकीत सविस्तर बाजू मांडली जाईल आणि दुध उत्पादकांना न्याय दिला जाईल असे त्यांनी सांगितले यावेळी दुध उत्पादक शेतकरी, डेअरी चालक व प्लांट चालकांनी आपल्या समस्या मांडल्या.