शिवसेनेच्या शहर प्रमुख पदी सचिन जाधव यांची नियुक्ती
अचानक शहर कार्यकारिणीत फेरबदल
मावळते शहर प्रमुख सातपुते यांचे पद अजूनही गुलदस्त्यात
अहमदनगर (प्रतिनिधी) – शहर शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये बदल करुन शिवसेनेच्या शहर प्रमुख पदाची जबाबदारी जिल्हा संपर्क प्रमुख असलेले सचिन जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली. मंगल गेट येथील जाधव यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. मात्र मावळते शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्याकडे कोणत्या पदाची जबाबदारी असेल हे अद्यापि स्पष्ट करण्यात आले नाही.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते सचिन जाधव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुभाष लोंढे, नगरसेवक अनिल लोखंडे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, जिल्हा संघटक अमोल हुंबे, अल्पसंख्याक समन्वयक अन्जर खान, उपजिल्हाप्रमुख संग्राम शेळके, युवा सेनेचे शहरप्रमुख महेश लोंढे, उपशहर प्रमुख प्रवक्ते विशाल शितोळे, शशांक महाले, वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओंकार शिंदे, जयेश कवडे, अभिजीत तांबडे, सागर गायकवाड, सुरज शिंदे, सागर काळे, अक्षय चुकाटे, नंदू बेद्रे, विजय जाधव, प्रल्हाद जोशी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी मावळते शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना पक्षा मध्ये आगामी काळात वेगळी जबाबदारी देण्याचा विचार आहे. जाधव यांचे जिल्हा संपर्क प्रमुख पद रिक्त झाले असून, यावर देखील प्रदेश पातळीवरून नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीने हे पत्र जाधव यांना देण्यात आलेले आहे. सचिन जाधव यांनी जिल्ह्यात संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळताना उत्तमप्रकारे पक्ष वाढविण्याचे काम केले. शहरात देखील उत्तम प्रकारे युवकांचे संघटन करुन शिवसेनेशी सर्वसामान्य जनता जोडण्याचे काम केले जाणार असून, जनसामान्य लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.