अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांच्या विविध प्रलंबीत मागण्या व प्रश्नासंदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना शिक्षक परिषदेचे नेते तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी निवेदन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, भिंगार राष्ट्रवादीचे संजय सपकाळ, प्राचार्य बाबासाहेब शिंदे, रमाकांत दरेकर, बद्रीनाथ शिंदे, चंद्रकांत डाके, घनश्याम सानप, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या अनेक प्रश्न प्रलंबीत असून, महाविकास आघाडीकडून प्रश्न सुटण्याची अपेक्षा आहे. अनेक प्रश्न वेळेवर न सोडविल्याने ते गंभीर बनले आहेत. शिक्षक दिनी शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारकडे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करणे, बीडीएस प्रणाली सुरु करणे, महापवित्र पोर्टल शिक्षक भरती त्वरीत पूर्ण करणे, सर्व शिक्षकांचे पगार एक तारखेला करणे, कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाल्यास किंवा विलीनीकरणात रहावे लागण्याच्या कालावधीची शिक्षक व शिक्षकेतरांना रजा मिळावी, कोरोना ड्युटी करणार्यांना उन्हाळी व दिवाळी सुट्टीत बदली रजा मिळावी, टप्पा अनुदानातील शाळांना पूर्ण अनुदान मिळावे, केंद्राप्रमाणे घोषित महागाई भत्ता राज्यातील सर्व कर्मचार्यांना तत्काळ घोषित करून फरकासह दिवाळीपूर्वी अदा करावा, शिक्षण संचालक कार्यालयाकडून मंजूर झालेल्या देयकाची यादी प्रसिद्ध करण्यात यावी, शालार्थ आयडीची प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, शिक्षकांना शालाबाहय व अशैक्षणिक कामे न देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे