नेवासा फाटा (कमलेश गायकवाड ): नेवासा तालुक्यातील मुकींदपूर येथील गट नं.७६ मध्ये जिल्हाधिकारी यांनी वाढीव गावठाण विस्तारासाठी राखीव ठेवलेले ४ हेक्टर क्षेत्र कायमस्वरुपी अधिकृत निवासासाठी व त्याठिकाणी शासकीय योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे वर्ग करावे या मागणीसाठी आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकात आमरण उपोषण सुरू केले असून यासंदर्भात एक पत्रच येथील ग्रामस्थांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुकींदपूर (ता.नेवासा) येथील वन विभागाच्या सरकारी जागेवर शेकडो कुटुंब गेली ४७ वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. या ठिकाणी असलेल्या वन विभागाच्या १२ हेक्टर ८२ आर या क्षेत्रापैकी ४ हेक्टर क्षेत्र हे गावठाण विस्तारासाठी तर ८ हेक्टर ८२ आर क्षेत्र हे शासकीय कार्यालयासाठी जिल्हाधिकारी यांनी १९८२ साली राखीव ठेवले आहे. फेर क्र. १५०९ अन्वये शासन दप्तरी तशी नोंद देखील आहे. याच जागेवर सुमारे ४५० कुटुंब ही ४७ वर्षांपासून वास्तव्य करून राहात आहेत. सदरचे क्षेत्र ग्रामपंचायतीस अधिकृतपणे वर्ग न झाल्याने या भागात ग्रामपंचायतीला कुठलीही योजना राबविता येत नाही. याठिकाणी राहात असलेली बहुतांशी कुटुंब ही सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेली आहे. ही सर्व कुटूंब पंतप्रधान /रमाई आवास योजनेसाठी पात्र आहेत.
केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार सर्व प्रकारच्या केंद्र व राज्य सरकारच्या मालकीच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या जमिनीवर राहत असलेल्या कुटुंबांना जागेवर घर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही २०११ पर्यंतची शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. असे असतांनाही तसेच ४ हेक्टर क्षेत्र हे गावठाण विस्तारासाठी राखीव असतांनाही सदर क्षेत्र ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे. प्रशासनाने आमची मागणी त्वरित मान्य करावी यासाठी ही आमरण उपोषण सुरू केले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आज गांधी जयंती दिनी आमरण उपोषणाची सुरवात आम्ही करत आहोत .
सदर उपोषणास मल्हार शिंदे, संतोष साळवे, नंदू वाकडे, आनंद साळवे, संदीप सोनवणे, प्रदीप खंडागळे, संदीप जाधव, शिवहरी शिंदे, रमजान शेख, जाफर शेख यांसह अनेक ग्रामस्थ बसले आहेत. हे आमरण उपोषण जो पर्यंत आमच्या नावे उतारा देत नाही तोपर्यंत चालू राहणार असल्याचे आनंद साळवे, मल्हार शिंदे, नंदू वाकडे, रमजान शेख यांनी सांगितले