बाळासाहेब बोराटे व परेश लोखंडे यांनी केलीअभियंतासह रस्त्याच्या कामाची पाहणी
अहमदनगर प्रतिनिधी – शनी चौक ते जुनी मनपा या रस्त्याचे दुरुस्तीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असून, या कासवगतीने सुरु असलेले काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली. तसेच नगरसेवक बाळासाहेब बोराटे व परेश लोखंडे यांनाही कळविले. त्यानंतर श्री.बोराटे यांनी याबाबत मनपाचे अभियंता सुरेश इथापे यांच्याशी तातडीने संपर्क साधून या ठिकाणी सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी शौकत सर, गणेश सोनवणे, धनू परभणे, सोपान सुडके, कटारिया व परिसारातील दुकानदार उपस्थित होते.
मनपा आयुक्तांना दिलेल्या निेवेदनात म्हटले आहे की, जुना मंगळवार बाजार येथे मनपाच्यावतीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरु केले. रस्ता चांगला होतोय ही चांगली आणि आनंदाची बाब आहे, परंतु रस्त्याचे काम एकदम संथ गतीने सुरु असून, त्यामुळे रस्त्याने येणार्या व जाणार्या वाहने व नागरिकांना त्रास होत आहे. तसेच या रस्त्याच्या बाजुला असलेल्या दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अगोदरच कोरोनामुळे व्यवसाय बंद होते, त्यातच आता रस्त्याच्या कामासाठी खोदकाम केल्याने ग्राहक येत नाहीत. तरी आयुक्त साहेबांनी या रस्त्याची तातडीने पाहणी करुन या रस्त्याचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी परिसरातील नागरिक व व्यवसायिकांनी केली आहे.
याप्रसंगी बाळासाहेब बोराटे व परेश लोखंडे म्हणाले, शनी चौक ते जुनी मनपा हा अत्यंत रहदारीचा रस्ता असून, तो प्रत्येक पावसाळात खराब होऊन नागरिकांना व परिसरातील व्यवसायिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. याबाबत मनपाशी वेळोवेळी निवेदने, पत्र व्यवहार करुन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती.परंतु तात्पुरती डागडुजी करुन रस्त्याचे काम होत.आता हा रस्ता चांगल्या पद्धतीने होत आहे याचे समाधान आहे, परंतु संबंधित ठेकेदाराने सुरु केलेले काम अत्यंत संथगतीने असून, त्यातच पावसाचे दिवस असल्याने खोदलेल्या रस्त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांच्या मागणीनुसार हे काम तातडीने व्हावे, यासाठी आपण मनपा अभियंत्यांना प्रत्यक्ष रस्त्याच्या अवस्था दाखवली असून, ठेकेदारास रस्ता तातडीने करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे. त्यामुळे आता तरी हा रस्ता तातडीने पुर्ण होईल,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.