सामाजिक कार्याला भक्तीची जोड देत सुसंस्कारित पिढी घडविण्याचे विजय भालसिंग यांचे कार्य
अहमदनगर प्रतिनिधी – भारतीय संस्कृतीत माता-पिता, गुरुजन, मातृभूमी याच्याप्रमाणे समाजाचेही ऋण मानले जाते.त्यामुळे प्रत्येकाने समाजातील गरजू व्यक्तीला मदत करावी,अशी शिकवण आपली संस्कृती देते.हेच विचार आपल्या कृतीत उतरवून सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग निस्वार्थ भावनेने योगदान देत आहेत.सामाजिक कार्याला भक्तीची जोड देत सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी त्यांचे कार्य अविरत सुरु आहे.
नगर तालुक्यातील वाळकी गावात अत्यंत गरीब शेतकरी कुटुबांत जन्माला आलेले विजय भालसिंग यांनी हलाखिच्या परिस्थितीचे चटके सोसले.गरीब परिस्थितीतून पुढे आलेल्या भालसिंग यांनी कधी समाजाशी नाळ तुटू दिली नाही.समाजाला हेवा वाटेल असे सामाजिक कार्य त्यांनी उभे केले.वाळकीच्या पंचक्रोशीत सामाजिक कार्याने त्यांनी आपला ठसा उमटवला.
एस.टी. बँकेची नोकरी सांभाळत पोटाला चिमटा देऊन त्यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले.कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असताना नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मधील जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रमास दहा वर्षापुर्वी संगणक संच भेट देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.अनाथ मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या भावनेने त्यांनी संगणक उपलब्ध करुन दिले. शिक्षणाला भक्तीची जोड देत अनेक टाळजोड दिले.
अनाथ अपंग वधू- वरांच्या लग्न कार्यासाठी ते नेहमीच मदत करत असतात.तर गरजू घटकातील अपघातग्रस्तांना आधार देण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो.वाळकी गावात बालकिर्तनकारांचा मेळावा घेऊन अनाथ मुलांना समाजाकडून मदतीचा हात दिला. गावातील वयोवृद्ध अनाथ व्यक्तीस दररोज जेवण देऊन, त्याच्या आखेरच्या श्वासापर्यंत सेवा केली. हुशार, गरजू विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी नेहमीच सहाय्य करीत असतात. गावातील पुरातन महादेव मंदिरात नंदीची मूर्ती स्वखर्चाने बनवून प्राणप्रतिष्ठा केली.
पुरातन ऐतिहासिक बारवेचा गाळ काढून बारव पुनरुज्जीवित केली. गावात महालक्ष्मी मातेची अखंड ज्योत सुरु ठेवली.दरवर्षी या जागृत महालक्ष्मीचे मंदिर रंगरंगोटी करून सजविण्याचा उपक्रम हाती घेतला. तसेच स्वयंभू गौरी शंकर मंदिराच्या सभा मडपास आकर्षक रंगरंगोटी केली. वाळकी पंचक्रोशीत अपघाताला कारणीभूत असलेले खराब रस्ते दुरुस्त होण्यासाठी संबंधित विभागाला निवेदन देऊन व पाठपुरावा करुन रस्त्याचे कामे मार्गी लावण्यास पुढाकार घेतला.
धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचा पुढाकार असतो. समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी व सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी त्यांचे अहोरात्र कार्य सुरु आहे.