नवरात्र उत्सवानिमित्त फिनिक्स फाऊंडेशनच्या
मोफत आरोग्य, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत आरोग्य, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबीरात नऊ दुर्गांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करुन समाजात नेत्रदान चळवळीत योगदान देण्याचे आवाहन केले. शिबीराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, फिनिक्स फाऊंडेशनने गरजू घटकांसाठी आरोग्य सेवेचे महायज्ञ अविरतपणे सुरु ठेवले आहे. मागील वीस ते पंचवीस वर्षापासून दृष्टीदोष असलेल्या सर्वसामान्य घटकांवर मोफत उपाचर करण्यासाठी फाऊंडेशनचे कार्य करीत आहे. लाखोंच्या संख्येने दृष्टीहीनांना नवदृष्टी देण्याचे काम करण्यात आले. तर कोरोनाच्या संकटकाळात देखील गरजू घटकांसाठी शिबीर घेण्यात आले. नेत्रदान व अवयवदान चळवळीत देखील फाऊंडेशनचे कार्य सुरु असून, अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. शरद कौठुळे म्हणाले की, फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले आहे. माणुसकीच्या भावनेने सर्व समाजातील गरजू घटकांना शिबीराच्या माध्यमातून आधार दिला जात आहे. निस्वार्थ भावनेची फिनिक्सची सामाजिक चळवळ सुरु आहे. नवरात्र उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या शिबीराचा लाभ सर्वसामान्यांना मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबीरात २५३ रुग्णांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली. विशेषता: महिलांसाठी मधुमेह, रक्तदाब व हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात आली. शिबीरात ग्रामस्थांसाठी कोरोना लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच शिबीरार्थींची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या शिबीरातून निवड झालेल्या ४३ रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पालन करुन हे शिबीर घेण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव दानवे यांनी केले. आभार राजेंद्र बोरुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ बोरुडे, आकाश धाडगे, गौरव बोरुडे, बाबासाहेब धीवर, रतन तुपविहीरे आदींसह फिनिक्स फाऊंडेशनचे सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.