अहमदनगर प्रतिनिधी – दिल्ली येथे 9 वर्षे वयाच्या बालिकेवर अमानुष बलात्कार करुन निघृणपणे केलेल्या खूनाचा निषेध करुन बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करुन निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, शहर जिल्हाध्यक्ष गणेश चव्हाण, भिम आर्मी जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल, मुन्नाबाई चावरे, अनिता म्हस्के, सारिका छजलानी, सुरेखा शिरसाठ, अविनाश देशमुख, अमित जाधव, राजु उघडे, मुकेश बग्गन, विजय सौदे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशामध्ये आजही मनुवादी मानसिकतेच्या धर्मांध नराधमांमुळे महिला व मुली सुरक्षित नाहीत. हे दिल्लीमध्ये घडलेल्या अमानुष घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दिल्लीमध्ये एक पुजार्याने 9 वर्षीय वयाच्या बालिकेवर अमानुष बलात्कार करुन तिची निघृणपणे हत्या केली, हत्यानंतर त्या बालिकेचा परस्पर अंत्यविधी करुन आपले पाप झाकण्याचा प्रयत्न केला. ही घटना अत्यंत निंदणीय असून माणुसकीला काळिमा फासणारी आहे.
या घटनेचा आम्ही संघटनेच्या माध्यमातून तीव्र निषेध करीत आहोत. सदर आरोपींना ताबडतोब अटक करुन फास्टट्रॅक कोर्टामार्फत सदर खटला जलद गतीने चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. शासनाने या गंभीर गुन्हामध्ये दुर्लक्ष केले अथवा दिरंगाई केली, तर संपूर्ण देशीर संघटनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
याप्रसंगी राजेंद्र करंदीकर म्हणाले, देशात महिला-बालिकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे, परंतु सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे, त्यामुळे या नराधमांचे मनोबल वाढत आहे. अशांना फाशी शिवाय दुसरी शिक्षाच नाही, तेव्हाच अशा घटनांना आळा बसेल. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर आरोपींना शिक्षा व्हावी, अशीच अपेक्षा सर्वांची आहे, असे ते म्हणाले.