अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नगर जिल्ह्याचे उद्योगपती नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांची निवड करण्यात आली. फुटबॉल असोसिएशनची सर्वसाधारण सभा नुकतीच हॉटेल आयरिस येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये फिरोदिया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सभेच्या प्रारंभी कोरोनाने मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील नामांकित खेळाडूंना श्रध्दांजली वाहण्यात आली. सभेच्या सर्व सभासदांनी नरेंद्र फिरोदिया यांची अध्यक्षपदी नियुक्तीचा ठराव एकमताने मंजूर केला. त्यांची तीन वर्षासाठी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या परंपरेनुसार अध्यक्षांना कार्यकारणी निवडण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला होता. नूतन अध्यक्ष फिरोदिया यांनी सर्व सभासदांच्या मतानुसार पुढील कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये उपाध्यक्षपदी मनोज वाळवेकर, खालिद सय्यद, जोगासिंह मिन्हास, अमरजीतसिंह साही, खजिनदारपदी रिशपालसिंह परमार, सचिवपदी गॉडविन डिक, सहसचिवपदी रोनप अ. फर्नांडीस, गोपीचंद परदेशी, कार्यकारणी सदस्यपदी सादिक सय्यद, प्रदीपकुमार जाधव, रमेश परदेशी, डॉ. सॅव्हिओ वेगास, जोहेब खान, गोपाल मनी, पल्लवी रुपेश सैंदाणे यांची निवड करण्यात आली आहे.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात नरेंद्र फिरोदिया यांनी शासनाच्या खेळा संबंधी एस.ओ.पी. जाहीर झाल्यानंतर सर्व वयोगटाच्या फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तर स्पर्धा समित्यांमध्ये आयोजनासाठी क्लबच्या सचिवांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. सचिव गॉडविन डिक यांनी आभार मानले आणि सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.