समाज एकत्र आल्यास विकास साधला जातो – आ.संग्राम जगताप
चर्मकार संघर्ष समिती आयोजित
निशुल्क वधू-वर सूचक व पालक परिचय मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद
अहमदनगर(प्रतिनिधी)- समाज एकत्र आल्यास विचारांची देवाण घेवाण होऊन विकास साधला जातो. तर समाजाला योग्य दिशा मिळते.चर्मकार समाजाला एकत्र करुन दिशा देण्याचे कार्य चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने केले जात आहे.सोशल मीडियाच्या युगात शेजारच्या व्यक्ती पासून माणूस दुरावत असून, लांब व्यक्तींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहे. समाज एकवटल्याशिवाय विकास साधणे अशक्य असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने शहरातील टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात निशुल्क राज्यस्तरीय वधू-वर सूचक व पालक परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत होते.
यावेळी उपमहापौर गणेश भोसले, समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे, नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे, निखील वारे, सुनिल त्र्यंबके, बाळासाहेब पवार, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, सहा.पो.नि. सुखदेव दुर्गे, नेत्रतज्ञ डॉ. रावसाहेब बोरुडे, अभियंता रोहिदास सातपुते, वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष आश्रुबा लोहकरे, केंद्रप्रमुख बापूसाहेब देवरे, नंदकुमार गायकवाड, युवक प्रदेशाध्यक्ष सुभाषराव भागवत, प्रदेश उपाध्यक्ष सचिन नन्नवरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, धावपळ व व्यस्त जीवनामुळे समाजात वधु वर परिचय मेळाव्याची गरज निर्माण झाली आहे. या मेळाव्यात समाजप्रबोधन करुन, मयत झालेल्या समजातील ज्येष्ठ व्यक्तींबद्दल दाखवलेली कृतज्ञता कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आली.प्रास्ताविकात शिवाजी साळवे यांनी चर्मकार समाज नोकरी, उद्योग धंद्यामुळे विखुरला गेला आहे.समाजाला एकत्र करण्याचे कार्य चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने केले जात आहे. समाजाच्या विकासासाठी समितीच्या माध्यमातून कार्य सुरु असून, वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून कार्यक्रम घेऊन सामुदायिक विवाहाचे नियोजन करण्यात येणार आहे.गरजू घटकातील इतर समाजाच्या मुला-मुलींचे लग्न देखील लावून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समाजातील बेरोजगार युवकांना चर्मोद्योग विकास महामंडळाकडून कर्ज मिळत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला असून, याबाबत पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी शिर्के यांनी समाज संघटित करून त्यांना संस्कार व दिशा देण्याचे कार्य समितीच्या वतीने सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
अभियंता रोहिदास सातपुते यांनी दोन वर्षाच्या कोरोनाकाळात समाजातील माणसे एकमेकापासून दुरावली. या कार्यक्रमातून समाज एकवटला असल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात उपस्थित चर्मकार समाजबांधव व महिलांनी विवाहासाठी हुंडा देणार नाही व घेणार नाही, तर अंधश्रद्धा हद्दपार करण्याचा सर्वानुमते हात उंचावून ठराव घेण्यात आला.मेळाव्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चर्मकार संघर्ष समितीच्या विविध पदावर नियुक्त्या करण्यात आल्या.तर समाजासाठी योगदान देणार्या दिवंगत व्यक्तींना मरणोत्तर जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आले.पाहुण्यांचे स्वागत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोप देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण आहेर यांनी मानले. आभार अभिजीत खरात यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोहकरे, सचिव विठ्ठल जयकर, पोपट बोरुडे, बाबासाहेब सोनवाणे, दिलीप शेंडे, युवक जिल्हाध्यक्ष अभिजीत खरात, जिल्हा उपाध्यक्ष संदीप शेवाळे, जिल्हा संघटक अभिषेक कांबळे, पाथर्डी उपाध्यक्ष दिलीप बातडे, गोकुळदास साळवे, बाळकृष्ण जगताप आदींनी परिश्रम घेतले.