अहमदनगर (प्रतिनिधी)- पाऊस लांबल्यामुळे शेतकर्यांच्या शेतातील उभे पिके पाण्याअभावी जळू लागले असताना, मुळा धरणाच्या पाण्याचे एक आवर्तन शेवगाव-पाथर्डी तालुक्याला तात्काळ सोडण्याची मागणी शेतकर्यांच्या वतीने करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांची भेट घेऊन सदर प्रश्नी चर्चा केली. तर सदर मागण्यांचे निवेदन जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने देण्यात आले. मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता पाटील यांनी या प्रश्नी बैठक घेऊन पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शेतकर्यांना दिले. यावेळी रज्जाक शेख, पंढरीनाथ यादव, चंद्रकांत पुंडे, मारुती पांढरे, बाळासाहेब दिंडे, कुंडलिक पांढरे, मळू पांढरे, एकनाथ पांढरे, सुरेश पांढरे, बालाजी शिंगाडे, लहानु पांढरे आदी उपस्थित होते.
चालू हंगामामध्ये शेवगाव तालुक्यातील चव्हाणवाडी, दिंडेवाडी, वाघोली, आव्हाने बुद्रुक, आव्हाने खुर्द, वडुले खुर्द, अमरापूर, फलकेवाडी, ढोरजळगाव, भातकुडगाव, भायगाव, हिंगणगावने, खामगाव, गरडवाडी, निंबेनांदुर, जोहरापूर या गावामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे शेतकर्यांच्या शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. या पिकांसाठी शेतकर्यांनी सर्व लागवडीचा आणि खताचा खर्च मोठ्या प्रमाणात केला आहे. सध्या शेतकर्यांनी कापूस, तूर, कांदे, भूईमूग,सोयाबीन, उडीद तर जनावरांच्या चार्यासाठी मका आदी पिके घेतलेली आहेत. गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने सदरची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. मागील वर्षी अति पावसाने पिके गेली, व आता चालू वर्षी पावसाने दिलेल्या ताणामुळे पिके जळू लागली आहेत. शेतकर्यांनी पिकांसाठी कर्ज काढून खते, बियाणे खरेदी करुन मशागती केली आहेत. शेवगाव-पाथर्डी तालुक्यासाठी मुळा धरणाचे एक आवर्तन सोडल्यास शेतकर्यांची पिके वाचू शकणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सध्या धरणात पाणीसाठा मुबलक असून, शेवगाव-पाथर्डी तालुक्यासाठी मुळा धरणातून एक आवर्तन शेतकर्यांच्या पिकासाठी सोडण्याची मागणी शेतकर्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
————————
पाऊस लांबल्याने शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकर्यांपुढे पिके जगविण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील उभे पिके पाण्याअभावी जळू लागली असताना, पिके जगविण्यासाठी तातडीने मुळा धरणाच्या पाण्याचे एक आवर्तनची गरज आहे. मागील वर्षी जास्त पावसाने शेतकर्यांचे नुकसान झाले होते. मात्र या वर्षी पावसाने दडी मारली असताना पिके वाचवण्यासाठी मुळा विभागाने तातडीने आवर्तन सोडून शेतकर्यांना आधार द्यावा. – हर्षदाताई काकडे (जिल्हा परिषद सदस्या)