नेवाशात आम आदमी पार्टी समर्थ पर्याय देईल – आघाव
नेवासा प्रतिनिधी – कमलेश गायकवाड
तालुक्यात आम आदमी पार्टी एक समर्थ पर्याय म्हणून उभी राहील असा ठाम विश्वास आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य राजेंद्र आघाव यांनी व्यक्त केला आहे.
नेवासा येथील प्रतिथयश वकील सादिक शिलेदार यांनी पत्रकार प्रवीण तिरोडकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब साळवे, आदींसह नुकताच राजेंद्र आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली आम आदमी पक्षात प्रवेश केला. पक्षाचे राज्य सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी मुंबईत या सर्वांना पक्षात प्रवेश दिला.
यावेळी शिंदे यांनी आम आदमी पक्षाच्या गेल्या सात वर्षांतील राजकीय वाटचालीचे विश्लेषण करून पंजाब विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातूनही पक्षात इनकमिंग वाढल्याकडे लक्ष वेधले.२०२४ मध्ये आम आदमी पार्टी महाराष्ट्रात दमदारपणे उतरणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट करून नगर जिल्ह्यात विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले.
पक्षाची ऑनलाईन सभासद नोंदणी प्रक्रिया समजावून देत नेवाशात लवकरच जनता आणि कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा नियोजन करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.
‘आप’ला जिल्ह्यात अनुकूल स्थिती –
नगर जिल्ह्यातील नागरिकांनी जवळपास सर्वच विधानसभा मतदार संघात सर्वच राष्ट्रीय, प्रादेशिक राजकीय पक्षांना आलटून पालटून संधी दिली. मात्र सर्वांकडूनच त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. आम आदमी पार्टीच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांनी अगोदर दिल्ली आणि त्यापाठोपाठ आता पंजाबमध्ये लोककल्याणकारी तसेच लोकाभिमुख राज्यकारभार चालविल्याचे दिसून आल्याने महाराष्ट्रही प्रभावित झाला आहे. नगर जिल्ह्यातही आम आदमी पक्षाला अनुकूल स्थिती निर्माण झाली असून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार दाखवून देणार असल्याचे ऍड.सादिक शिलेदार यांनी सांगितले.