अहमदनगर (प्रतिनिधी)- आद्य नृत्यांगना नामचंद पवळा भालेराव यांच्या स्मारकाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाकडे वर्ग केला आहे. परंतु दीर्घकाळापासून सदरचा प्रस्ताव प्रलंबित असून, नृत्यांगना पवळा यांच्या राष्ट्रीय स्मारकास महाराष्ट्र शासनाने तात्काळ निधी देण्याची मागणी आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी केली. तर महान कलेच्या सम्राज्ञीच्या स्मारकासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी दिला.
आद्य नृत्यांगना नामचंद पवळा भालेराव यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त कला सम्राज्ञी पवळा कलामंचच्या वतीने जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भालेराव बोलत होते. प्रारंभी नृत्यांगना नामचंद पवळा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी बसपाचे जिल्हा प्रभारी संजय डहाणे, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, आरपीआय उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक खरात, विजय खरात, सरपंच सुभाष गडाख, गणेश दवंगे, सोमनाथ पावसे, सामाजिक कार्यकर्ते यादवराव पावसे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, वृक्षमित्र गणपत पावसे, नितीन भालेराव, रामनाथ गडाख, अशोक भालेराव, छाया चव्हाण, अनिता दिवटे, सगाजी पावसे, बाळासाहेब भालेराव, भीमा पावसे आदिंसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
यादवराव पावसे म्हणाले की, नामचंद पवळा यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल समाज त्यांचा कायम ऋणी राहील. त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम कला सम्राज्ञी पवळा कलामंचच्या माध्यमातून सुरु आहे. लवकरच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांच्या राष्ट्रीय स्मारकास निधी मिळवून देण्यासाठी सरपंच सेवा संघ व कला मंच प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी कला सम्राज्ञी पवळा यांच्या इतिहासाला उजाळा दिला. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे यांनी स्मारकासाठी हिवरगाव पावसा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सर्वपरीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गरजू घटकातील विद्यार्थ्यांना कला सम्राज्ञी पवळा कलामंच, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज विचार मंच हिवरगाव पावसा यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच बुध्द विहार समन्वय समिती नागपूर यांच्या वतीने स्कूल बॅग देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रंजना भालेराव, पल्लवी भालेराव, राजू दारोळे, बाबासाहेब कदम, विलास दारोळे यांनी परिश्रम घेतले.