संगमनेर प्रतिनिधी – कै.योगेश डोंगरे या होतकरुन तरुणाचे अपघाती निधन हे सर्वांसाठीच दुर्दैवी आहे.परंतू या दु:खाला बाजूला सारुन मुलाचे अवयव दान करण्याचा डोंगरे कुटूंबाने घेतलेला निर्णय हा संपूर्ण राज्यासमोर एक आदर्श ठरला असून, ग्रामीण भागातील एका कुटूंबाने जपलेली सामाजिक बांधिलकी सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.
कै.योगेश डोंगरे या युवकावर कौठे मलकापूर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी कै.योगेश डोंगरे यांच्या पार्थीवावर पुष्पहार अर्पण करुन, श्रध्दांजली अर्पण केली. डोंगरे कुटूंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले आणि दिलासाही दिला.
श्रध्दांजली वाहतांना खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, योगेशवर अनेक महिन्यांपासुन उपचार सुरु होते. परंतू एवढ्या मोठ्या प्रयत्नांनंतरही योगेशचे प्राण वाचवू शकले नाहीत. यासर्व दु:खावर मात करुन, ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटूंबातील असलेल्या डोंगरे परिवाराने त्याचे अवयव दान करण्याचा घेतलेला निर्णय हा खुप महत्वपूर्ण आहे.
अवयव दानाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रबोधन केले जाते.परंतू जिथे सुशिक्षीत माणसं पुढे येत नाहीत तिथे डोंगरे परिवारासारख्या ग्रामीण भागातील कुटूंबाने पुढे येवून केलेला निर्णय संपूर्ण राज्यात एक आदर्श निर्माण करणारा ठरला आहे. यासाठी ग्रामस्थ, कार्यकर्ते यांनी घेतलेला पुढाकारही माझ्या दृष्टीने खुप महत्वाचा असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला.
तालुक्यातील मलकापूर येथील योगेश किसन डोंगरे या २५ वर्षीय तरुणाचा अपघात झाल्यानंतर डॉ.विखे पाटील फौंडेशनच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचे ब्रेडडेड झाल्याचे उपचारा दरम्यान स्पष्ट झाले होते. डोंगरे कुटूंबियांनी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करुन, रविवारी विखे पाटील मेमोरीयल रुग्णालयातून ग्रीनकॉरीडॉर व्दारे हे अवयव पुर्ण आणि नाशिक येथील रुग्णालयात पोहोचविण्यात आले. डोंगरे परिवाराच्या या निर्णयामुळे अन्य तिन रुग्णांना जिवनदान देण्यात वैद्यकीय क्षेत्राला मोठे यश प्राप्त झाले आहे. नगर जिल्ह्यात अवयव दानाची अशा पध्दतीची घटना प्रथमच घडली आहे. याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्धन आहेर, मालुंजेचे सरपंच संदिप घुगे, गुलाब भोसले, युटेक कारखान्याचे कार्यकारी संचालक पवार आदिंनी आपली श्रध्दांजली अर्पण केली.