नामचंद पवळा यांनी कला क्षेत्रातील महिलांसाठी एक आदर्श निर्माण केला -प्रा. भगवान अहिरे

- Advertisement -

आद्यनृत्यांगना नामचंद पवळा यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत

अहमदनगर (प्रतिनिधी)- एकोणिसाव्या शतकातील स्त्रीया कला क्षेत्रात काम करत नव्हत्या. त्या काळात आद्यनृत्यांगना नामचंद पवळा हिवरगावकर यांनी मोठ्या धाडसाने स्टेजवर पाऊल ठेवून महाराष्ट्रभर सर्वत्र लावण्या सादर केल्या. लावणीला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. कला क्षेत्रातील महिलांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला. कलाकाराला पाहण्यासाठी तिकीट असणे, ही इतिहासात नोंद घेणारी घटना आहे. नामचंद पवळा या अद्वितीय व्यक्तिमत्व होत्या, असे प्रतिपादन तमाशा व लोककला अभ्यासक तथा संशोधक प्रा. भगवान अहिरे यांनी केले.

आद्यनृत्यांगना नामचंद पवळा हिवरगावकर यांची 153 वी जयंती कला सम्राज्ञी पवळा कलामंच व महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, राजश्री शाहू विचार मंच हिवरगाव पावसा (ता. संगमनेर) यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रा. अहिरे बोलत होते.
वृक्ष मित्र प्रा. गणपत पावसे म्हणाले की, नामचंद पवळा यांनी कलाक्षेत्रात केलेले कार्य अलौकिक आहे. त्यांच्या स्मृती जतन करण्याचे कार्य कला सम्राज्ञी पवळा कलामंच मार्फत केले जात आहे. दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राजहंस दूध संघाचे संचालक डॉ. प्रमोद पावसे यांनी नामचंद पवळा यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी निधी मिळवण्याकरिता संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. संस्थेचे सचिव पवळा भालेराव यांचे पणतू नितीनचंद्र भालेराव म्हणाले की, नामचंद पवळा यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी हिवरगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने आक्रमक लढा दिला जाणार आहे. त्यांचे नात भाचे दिवंगत चांगदेव लहुजी भालेराव यांनी भव्य स्वरूपाच्या स्मारकाचा प्रस्ताव तयार केला आहे. सदर प्रस्ताव संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाकडे दाखल केला आहे. सदर प्रस्ताव 1 जानेवारी 2020 रोजी राज्य शासनाने ग्रामविकास विभागाकडे वर्ग केला आहे. मात्र हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे दीर्घकाळापासून प्रलंबित असून, त्याला गती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कला सम्राज्ञी पवळा कलामंचच्या माध्यमातून दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने नामचंद पवळा यांच्या स्मरणार्थ गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ पावसे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यादवराव पावसे, रामनाथ गडाख, शिवसेना मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक विलास कदम, संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब भालेराव, राजीव दारोळे, नारायण मोकळ, रंजना भालेराव, अभिजीत भालेराव, रोहिणी भालेराव, विजय निळे, गणेश दवंगे, विकास दारोळे, सुमित पावसे, सुयोग भालेराव, पल्लवी भालेराव आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles