श्रीगोंदा(प्रतिनिधी)
उन्हाळी हंगामा संदर्भात कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा कुकडी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे येथे संपन्न झाली होती.
या बैठकीत श्रीगोंदा तालुक्याच्या वाटेला ६.५ दिवसाचं आवर्तन नियोजित होतं. परंतु ६.५ दिवसाच्या आवर्तनामध्ये विसापूर तलाव व कालवा याचे अंदाजे ५,५०० हेक्टर क्षेत्रासाठी आवर्तन करणे शक्य नव्हते. तर विसापूरखालील ५,५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी २०० ते २५० mcft पाण्याची अतिरिक्त आवश्यकता होती.
त्यानुसार माणिकडोह व वडज या दोन धरणांतून साधारणतः २०० mcft एवढे अतिरिक्त पाणी सोडण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे दोन दिवसांनी आवर्तन कालावधी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे विसापूरखालील लाभ धारकांना याचा फायदा होणार आहे. ऐनवेळी हंगामामध्ये असा निर्णय घेतल्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.