अहमदनगर प्रतिनिधी –
उड्डाणपुलाच्या कामासाठी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत रात्री १२ ते पहाटे ६ या वेळेत सर्व वाहनांना नगर शहरात प्रवेश बंद करण्यात येणार आहे. याबाबत नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत,अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली.
पर्यायी वाहतूक व्यवस्था : नगरकडून पुण्याकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक शेंडी बायपास-शासकीय दूध डेअरी चौक-विळद बायपास-निंबळक बायपास-कांदा मार्केट रोड-केडगाव बायपास मार्गे वळविण्यात येणार आहेत.
पुण्याकडून मनमाड, औरंगाबादकडे जाणारी वाहतूक केडगाव बायपास- निंबळक-विळद-शासकिय दूध डेअरी चौक-शेंडी बायपासमार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच बीड, जामखेड, पाथर्डीकडे होणारी अवजड वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे.
पुण्याकडून येणार्या वाहनांकरिता केडगाव बायपास-अरणगाव-वाळुंज-मुठ्ठी चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. पुणे, नगर, औरंगाबाद या मार्गावरील हलक्या वाहनांसाठी मार्ग बदलण्यात आला आहे.
यामध्ये सक्कर चौक-आनंदऋषीजी हॉस्पिटल-महात्मा फुले चौक-कोठी आणि सक्कर चौक येथून टिळक रोड-आयुर्वेद कॉलेज कॉर्नर-नेप्ती नाका-दिल्ली दरवाजा-अप्पू हत्ती चौक-पत्रकार चौक-एसपीओ चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे शहरातून अवजड वाहतूक होऊ नये, म्हणून यश पॅलेस, कोठी चौक, नेप्तीनाका येथे तसेच दिल्ली दरवाजाकडील रस्त्यावर, पत्रकार चौक, अप्पू हत्ती चौक येथील रस्त्यांवर फक्त दुचाकी व हलकी वाहने जातील, असे व्हाइट बॅरीअर बसविण्यात येणार आहेत.