यतिमखाना मधील मुलांसह टाटा व्हॉलिंटीअर्सनी आणि संलग्न संस्थांनी केली इफ्तार पार्टी
भाईचारा व सामाजिक एकात्मतेचा संदेश
विद्यार्थ्यांनी आकाशात सोडले रंगीबेरंगी फुगे; जादुगारच्या शो मध्ये विद्यार्थ्यांची धमाल
अहमदनगर (प्रतिनिधी)- भाईचारा व सामाजिक एकात्मतेचा संदेश देत रमजाननिमित्त शहरातील यतिमखाना वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह टाटा व्हॉलिंटीअर्सनी व बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या वतीने इफ्तारचा (उपवास सोडण्याचा) कार्यक्रम घेण्यात आला. टाटा व्हॉलिंटरिंग विक 21 उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. तर मुलांच्या मनोरंजनासाठी घेण्यात आलेल्या जादुगारच्या शो मध्ये विद्यार्थी धमाल केली.
या कार्यक्रमासाठी टाटा पॉवरचे विश्वास सोनवले, सागर उशीर, अक्षय परब, बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे फादर जॉर्ज दाब्रेओ, तनिश्कचे प्रतिनिधि किरण सोनवणे, टायटनचे प्रतिनिधि सुधीर तडके, सुजलॉनचे अधिकारी प्रवीण पवार, पॉवरकॉनचे दिनेश माळी, यतिमखानाचे विश्वस्त ॲड. फारुक बिलाल शेख, अधीक्षक गुफरान शेख, कर्मचारी हारुन शेख आदींसह टाटा समुहातील व त्यांना संलग्न कंपनीचे अधिकारी, कुटुंबीय, बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
उपस्थित पाहुण्यांनी यतिमखाना मधील विद्यार्थ्यांसह इफ्तारी केली. टाटा समुहाच्या वतीने बचत गटाच्या महिलांनी विद्यार्थ्यांसाठी बनवलेले पौष्टिक खाऊ, आईसक्रीमचे वाटप केले. यतिमखाना वसतिगृहात माणुसकीच्या भावनेने कार्य सुरु आहे. समाजातील दुर्लक्षीत घटकातील मुलांचे घरातील मुलांप्रमाणे सांभाळ करुन त्यांना घडविण्यात येत आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे भवितव्य असून, ही संस्था मुलांना दिशा देत असल्याची भावना टाटा समुहाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तर विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण मिळण्यासाठी टाटा समुहाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
विश्वस्त ॲड. फारुक बिलाल शेख यांनी यतिमखाना येथे आई-वडिल नसलेल्या व आर्थिक दुर्बल घटक असलेल्या विद्यार्थ्यांचे पालन पोषण करुन त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून समाजात उभे करण्याचे काम केले जात असल्याची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे जादूचे प्रयोग दाखविण्यात आले. याचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.