घटनेमागील खरे सुत्रधार पोलिसांनी शोधून काढण्याची आवश्यकता – राधाकृष्ण विखे पाटील
नगर दि.१२ प्रतिनिधी
रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात ईदगाह मैदानावर पॅलेसस्टाईनचा झेंडा फडविण्यात आल्याची घटना अतिशय गंभीर असून, या प्रकाराची सखोल चौकशी करुन, घटनेमागील खरे सुत्रधार पोलिसांनी शोधून काढण्याची आवश्यकता असल्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
मंत्री विखे पाटील यांनी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करुन राज्यात व जिल्हयात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा होत असताना काही अपप्रवृत्तीनी गालबोट लावण्याच्या हेतूने प्रार्थनेच्या दरम्यान पॅलेस्टाईनचा झेंडा फडविला. ही अतिशय गंभीर बाब आहे. या बाबत पोलिसांनी तातडीने दखल घेवून गुन्हा दाखल केला असला तरी, या घटनेमागील खरे सुत्राधार शोधून काढणे अतिशय गरजेचे असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
या गंभीर घटनेच्या तपासात कोणताही हलगर्जीपणा न करता पोलीस प्रशासनाने झेंडा फडकवीणारे आणि त्यांना पाठबळ देणारे सुत्रधार कोण आहेत याची कसून चौकशी करावी. कारण अशी देशद्रोही वृत्ती कार्यरत असेल तर, प्रशासनाने ती मुळापासून उखडून टाकण्याची गरज आहे. अशा देशद्रोही वृत्तीला कोणीही आश्रय देण्याची चुक करु नये असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
दुर्दैवाने काही राजकीय पक्ष आपल्या जाहिरनाम्यातच फुटरतावादी वृत्तीला प्रोत्साहन देत आहे. पण अशा घडणा-या घटनांमधून आत्मनिरिक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे मत ना.विखे पाटील यांनी शेवटी व्यक्त केले.