न्यु आर्टस महाविद्यालयास वेगळ्या उंचीवर घेऊन जाताना प्राचार्य व प्राध्यापकांची सेवा महत्त्वाची -रामचंद्र दरे
न्यू आर्ट्स महाविद्यालयात प्राचार्य झावरे व प्राध्यापक जावळे यांचा सेवापूर्तीचा गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाच्या प्रगतीसाठी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्य दिशादर्शक ठरले. संस्थेचे एक स्वायत्त महाविद्यालय म्हणजे न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाने सर्वसामान्य वर्गातील मुलांना घडविण्याचे कार्य केले. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविताना व महाविद्यालयास गुणवत्तेने वेगळ्या उंचीवर घेऊन जाताना प्राचार्य व प्राध्यापकांची सेवा महत्त्वाची आहे. समाजाची शैक्षणिक व सांस्कृतिक गरज ओळखून ती गरज भागविण्याचे काम ही संस्था करत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी केले.
न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य बी.एच. झावरे व प्राध्यापक ज्ञानदेव जावळे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात अध्यक्ष म्हणून दरे बोलत होते. राजर्षी शाहू महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना दारकुंडे, पर्यवेक्षक सुभाष गोरे आदी उपस्थित होते.
पुढे दरे म्हणाले की, शताब्दीचा शैक्षणिक वारसा असणारी ही एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था आहे. 11 हजार विद्यार्थी असलेलं न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाला देशभर जो नावलौकिक मिळवून दिला, त्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एच. झावरे यांचा मोठा वाटा आहे. यासाठी त्यांना प्राध्यापक वर्गाचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्यामध्ये प्रा. ज्ञानदेव जावळे यांचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या प्रांगणातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन कार्यक्रमाचे प्रारंभ झाले. सेवापूर्ती निमित्त प्राचार्य डॉ.बी.एच. झावरे व शोभाताई झावरे, प्रा. ज्ञानदेव जावळे व मनीषा जावळे यांचा सपत्नीक मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या सेवक कल्याण निधीच्या वतीने झावरे व जावळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा संजय जाजगे, प्रा. सुभाष गोरे, प्रा. भाऊसाहेब कचरे, प्रा. मोहनराव देशमुख आदी शिक्षक वृंदांनी आपली मनोगते व्यक्त केली.
प्रा. ज्ञानदेव जावळे यांनी या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी वर्गातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. या ज्ञानदानाच्या प्रवाहात सहभागी होवून सेवा करता आल्याचे भाग्य असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी आपला जीवनपट उलगडला.
प्राचार्य भास्करराव झावरे म्हणाले की, आई-वडिल अशिक्षित असल्याने त्यांनी कधीही सुरु असलेल्या शिक्षणात लुडबुड केली नाही. मात्र सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आई-वडिलांची लुडबुड सुरु असते. पालकांनी विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याच्या वाटा निवडण्यासाठी मोकळीक द्यावी. या संस्थेतही काम करताना पूर्णत: स्वातंत्र्य व अधिकार देण्यात आले होते. यामुळेच महाविद्यालयाच्या दृष्टीकोनाने अनेक महत्त्वाचे टप्पे पार करुन यश मिळवता आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ॲड. विश्वासराव आठरे पाटील म्हणाले की, उत्तम प्राध्यपकांमुळे संस्था उभी राहिली आहे. सर्वांच्या त्याग, परिश्रम व कष्टाने शैक्षणिक गुणवत्तेचा कळस गाठता आला. शिक्षकांनी संस्थेच्या संख्यात्मक आणि गुणात्मक विकासामध्ये भर घालण्याची फार मोठे कार्य केले. त्यामुळेच संस्था आज शतकोत्तर वाटचाल करीत आहे. प्राचार्य आणि सहकारी प्राध्यापक असा सेवापूर्ती नेत्रदीपक गौरव सोहळा पार पाडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य कल्पना दारकुंडे यांनी केले. सेवापूर्तीनिमित्त प्रा. जावळे यांनी संस्थेस आर्थिक मदतीचा धनादेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले. आभार प्रा दत्तात्रेय नकुलवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. गणेश भगत, प्रा. प्रतिभा पवार, प्रा. नितीन पानसरे, प्रा. स्मिता मेढे, प्रा. सीता गोरे यांनी परिश्रम घेतले.
- Advertisement -