महापालिकेत कचरा वेचकांना मतदानाचा हक्क बजविण्याची शपथ
आपल्या एका मताने चांगला व सक्षम उमेदवार निवडून येणार -डॉ. पंकज जावळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरात कचरा गोळा करणाऱ्या कचरा वेचकांना मतदानाचा हक्क बजविण्याची शपथ देण्यात आली. अहमदनगर महापालिका व कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या माध्यमातून मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जागृतीचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित कचरा वेचकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता, निर्भय व धर्मनिरपेक्षपणे मतदान करुन लोकशाही सक्षम करण्याचा संकल्प केला. यावेळी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत चे जिल्हा समन्वयक विकास उडानशिवे उपस्थित होते.
आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले की, मतदानाने लोकशाही मजबूत होणार आहे. आपल्या एका मताने चांगला व सक्षम उमेदवार निवडून येणार आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून, आपल्या मतातून लोकशाहीला बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास उडानशिवे यांनी संघटनेच्या माध्यमातून सर्व कचरा वेचकांचे शंभर टक्के मतदान घडवून आणले जाणार असून, सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुचित केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
- Advertisement -