विखे कुटुंबातील नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले
शरद पवार यांची विखे पिता पुत्रावर घणाघाती टीका
नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरी येथे सभा
अहमदनगर (प्रतिनिधी)
स्व.धनंजय गाडगीळ, विठ्ठलराव विखे यांनी आशिया खंडातील पाहिला सहकारी साखर कारखाना उभा केला.त्यानंतर विखे यांच्या नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले असा सवाल करतानाच,त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असून आपले अपयश झाकण्यासाठी ते आता टीका टिपन्नी करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, मा. आ. दादा कळमकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, ‘आप’चे जिल्हाध्यक्ष राजू आघाव, रावसाहेब म्हस्के, संदीप वर्पे, योगिता राजळे, अरूण कडू, किरण कडू, अरूण तनपुरे, सचिन म्हसे, अमृत धुमाळ, राजूभाऊ शेटे, धनराज गाडे, बाळासाहेब आढाव, प्रकाश देठे, सुरेश वाबळे, मच्छिंद्र सोनवणे, संपत म्हस्के यांच्यासह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
पवार म्हणाले की,दुष्काळी जिल्हा म्हणून नगरची ओळख होती.त्या काळात जिरायत भागाच्या जमीनी बागायती करण्यासाठी निळवंडे प्रकल्प उभा करण्याचा निर्णय झाला. मात्र त्यावेळी,आज जे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील विरोधी उमेदवार आहेत त्यांच्या वाडवडीलांनी निळवंडेला विरोध केला.आता ते पुन्हा लोकसभेमध्ये जाऊ पाहत आहेत.त्यांना रोखण्याचे काम करावेच लागेल असे पवार म्हणाले.
खा.विखे यांना टोला लगावताना पवार म्हणाले की,कोणी इंग्रजी बोलतो म्हणून शहाणा झाला असे होत नाही. तुमचे इंग्रजी बोलणे तुम्हाला लखलाभ. नीलेश लंके यांच्यासारखा फाटका माणूस,फाटक्या माणसाच्या हिताची जपवणूक करणारा असल्याने लंके यांना मताधिक्क्याने लोकसभेत पाठवण्याचे आवाहन पवार यांनी केले.
दहा वर्षे ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांनी काय काम केले असा सवाल करून पवार म्हणाले, मोदी सरकारने केलेली कामे या निवडणुकीच्या प्रचारात मांडली पाहिजेत मात्र तसे होताना दिसत नाही. दहा वर्षांपूर्वी मनमोहनसिंग यांच्यावर टीका करून मोदी हे महागाईवर बोलत होते. सत्ता हाती दिल्यानंतर १५ दिवसांत ५० टक्के महागाई करणार असे मोदी सांगत होते. ७० रूपयांचे पेट्रोल १०६ रूपयांवर गेले हे पन्नास टक्के महागाई करण्याचे वचन का ? ४०० रूपयांचे सिलेंडर ११६० वर गेले असल्याचे पवार म्हणाले.
▪️चौकट
त्यांच्या गॅरंटीचा चेक वटत नाही !
या निवडणूकीत मोदी गॅरंटीचा गवगवा केला जातोय. ही टीकाऊ गॅरंटी नाही. त्यांच्या गॅरंटीचा चेक वटत नाही. मोदी यांनी सत्तेचा गैरवापर केला. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून खोट्या केसेस केल्या. त्यांच्या विचाराविरोधात वागले तर इडी, सीबीआयचा वापर करून त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पवार म्हणाले.
▪️चौकट
जिल्ह्यात सत्तेचा गैरवापर, दमदाटी
राज्यात उत्तम साखर कारखाना म्हणून ओळख असलेला राहुरी साखर कारखाना, मुळा प्रवरा वीज संस्था या संस्था विखे यांनी बंद पाडल्या. शासकीय मेडीकल कॉलेज जिल्ह्यात होऊ दिले नाही.त्यांच्या खासगी मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश कशा पध्दतीन दिले जातात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. जिल्ह्यात सत्तेचा गैरवापर, दमदाटी सुरू असल्याचा आरोप पवारांनी केला.
▪️चौकट
विविध घटकांच्या प्रश्नांसाठी नीलेश लंके हे उत्तर- Advertisement -
आमचा उमेदवार दिसायला फाटका आहे. दहा बाय दहाच्या खोलीत राहणारा हा माणूस. कांदा, कापूस, सोयाबिन आदी शेतकरी वर्गाशी निगडीत प्रश्न, स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी, वंचितांचे प्रश्न मांडण्यासाठी नीलेश लंके हेच एकमेव उत्तर असल्याचे पवार म्हणाले.
▪️चौकट
पवारांप्रमाणे कोणी निर्णय घेतले नाहीत
केंद्रात कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी जे निर्णय घेतले असे निर्णय इतर कोणत्याही मंत्रयाने घेतले नाहीत. आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. याच कृषीप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करतोय ही शोकांतीका आहे. कांदा, सोयाबिन, कपाशी, दुधाच्या भावाची आज काय स्थिती आहे ? दुधाला ५ रूपये अनुदान देतो म्हणाले ते देखील मिळाले नाही. मग शेतकरी कसा सुखी होणार ? ज्यांना पाच वर्षापूर्वी आपण दिल्लीला पाठविले ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकदाही बोलले नाहीत.