महाराष्ट्र स्थापना दिनी शहरात आठव्या राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धेचे आयोजन
ऐतिहासिक वस्तू संग्रहालय स्थापना दिनाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्र अहमदनगरच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र दिनी (दि.1 मे) ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व जागतिक मोडी लिपी प्रसार समितीच्या संयुक्त विद्यमाने आठव्या राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदनगर , नाशिक आणि कोल्हापूर या पाच शहरात एकाच दिवशी आणि एकाच वेळी सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा आणि शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. मोडी लिपी प्रचारार्थ भव्य स्पर्धाचे हे आठवे वर्ष आहे. ही स्पर्धा 1 मे रोजी सकाळी 10 वाजता होणार असून, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वच केंद्रावरील दोन्ही स्पर्धा गटातील सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रवेशपत्र हे केंद्रावरच भरावयाचा आहे. ऑनलाईन प्रवेशपत्र भरण्याची मुभा नाही. दूर अंतरावर रहाणारे स्पर्धेच्याच दिवशी अर्धा तास आधी येऊन प्रवेशपत्र भरू शकतील. पुस्तक विक्रेत्यांनाही मोडी विषयक पुस्तकांचे स्टॉल लावण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
स्पर्धकांनी स्वत:चे पेन, बोरू, टाक, पेन्सिल, खोड रबर, फुट पट्टी आणि धरावयास पॅड आणावे. स्पर्धकांस कागद पुरवले जातील. काळ्या शाईचा वापर अनिवार्य आहे. सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धेकरिता देवनागरी लिपीत उतारा दिला जाईल. तो मोडी लिपीत लिहावयाचा आहे. अक्षर चुका ग्राह्य धरल्या जातील. शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धेकरिता 1 शिवकालीन आणि 1 पेशवेकालीन कागद असेल. दोन्ही कागदांकरिता अर्धा-अर्धा तास दिला आहे. अधिक माहितीसाठी डॉ. संतोष यादव 9372155455 यांच्याशी संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.