लंकेंनी विखेंची पळता भुई थोडी केलीय ! प्रभावती घोगरे यांची घणघाती टीका
नगर : प्रतिनिधी
खासदार सुजय विखे तुमच्या आमच्यासाठी नव्हे तर त्यांच्या स्वार्थासाठी लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.आमदार नीलेश लंकेंनी विखे कुटुंबाची पळता भुई थोडी केली आहे.त्यांनी सर्वसामान्यांच्या जिवावर गेल्या पन्नास वर्षांत जमा केलेली धनसंपत्ती ते आता बाहेर काढतील, भूलथापा मारतील.विखे कुटुंबाच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन लोणी खुर्दच्या सरपंच प्रभावतीताई घोगरे यांनी केले.
नगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ चिचोंडी पाटील आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत घोगरे बोलत होत्या. निवडणूक एकतर्फी नाही ही जमेची बाजू असून नीलेश लंके देत असलेली टक्कर ही वाखाण्याजोगी गोष्ट आहे.त्यामुळे प्रवरेच्या कुठल्याही भुलथापांना बळी न पडता लंके यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे रहण्याचे आवाहन श्रीमती घोगरे यांनी केले.
पाच वर्षांपूर्वी,मागच्या निवडणुकीत साकळाईचे पाणी आणतो असे म्हणाले होते. त्यांनी आणले का पाणी ? ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुमच्या आमच्यासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी उभे आहेत. स्वतःचे अस्तित्व टिकले पाहिजे, स्वतः मोठे झाले पाहिजे हेच विखे कुटूंबाचे राजकारण असल्याची घणाघाती टीका घोगरे यांनी केली.
घोगरे पुढे म्हणाल्या, स्थानिक असलेले नीलेश लंके यांना कधीही फोन करा ते तुमच्यासाठी रात्री अपरात्रीही धावत येतील. आमचे प्रवरेचे पाहुणे तुमच्या रस्त्याला कधी येतील ? कधी तुम्ही फोन करणार ? शिवाय नगर-मनमाड हायवे इतका जोरात आहे की त्यांना येण्यासाठी कीती तास लागतील ? घरचा, स्थानिक तो स्थानिक असतो.
घोगरे पुुढे म्हणाल्या, प्रवरा भागात अतिशय दबाव तंत्राचा, हुकूमशाहीचा वापर करण्यात येतो. आम्ही ज्यावेळी सोसायटी व ग्रामपंचायत निवडणूक जिंकलो त्यावेळी आमच्या गावातील प्रत्येक नागरीकावर बारीक लक्ष ठेण्यात येते. आम्ही कुठे बसतो, संध्याकाळच्या वेळेस आमच्या घरातील कुटूंबिय एखाद्या दुकानात बसले तर लगेच त्यांना निरोप येतो. तुझ्या दुकानात कसे बसले ? तुझे दुकान बंद करतो. गावात कुठे उठ बस करायची हे ठरवण्याचा अधिकार लोकशाहीने त्यांना दिला आहे का असा सवाल घोगरे यांनी केला.
▪️ चौकट
विरोधकांच्या संस्था बंद पाडण्याचा उद्योग
आपला माणूस कोण हे ओळखा. आमच्याकडच्या सगळ्या सहकारी संस्था त्यांनी बंद पाडल्या.फक्त विरोधासाठी विरोध. बाभळेश्वर दुध संघ, मुळा प्रवरा, सुतगिरणी, खरेदी विक्री संघ या विरोधकांच्या ताब्यातील संस्था बंद पाडणे हाच उद्योग. त्यांच्या हट्टापाई लोकांच्या प्रपंचावर नांगर फिरविण्याचे काम केले जात असल्याचा आरोप घोगरे यांनी केला.
▪️चौकट
आपलं कोण व लबाड कोण हे ओळखा
मध्यंतरी दिल्लीला भेटायला गेल्यानंतर कांद्याची निर्यात बंदी उठल्याचे सांगितले गेले. सत्कारही घेतले. दोन दिवसानंतर सचिवाने सांगितले की निर्यात बंदी उठलेली नाही. आपलं कोण व लबाड कोण हे ओळखायला शिका असे आवाहन घोगरे यांनी केले.
▪️चौकट
त्यांनी उत्तरेचा कारभार पहायचा की दक्षिणेचा ?
सरकार यांचे, सगळी पदे यांच्याच घरात. भाजपाकडे दुसरे कोणी नव्हते का ? आमच्याकडे उमेदवार न्यायला आले ? १९ लाख लोकांमध्ये एकही कर्तबगार, ज्याच्यावर भरवसा ठेउन दिल्लीला पाठवावा असा माणूसच सापडला नाही का ? थेट लोणीला येउन धडकले । त्यांच्यावर कमी लोड आहे का ? लोणीचे पहायचं, शिर्डी मतदारसंघाचं पाहायचं, वडील आमदार, जिल्हा परीषद त्यांच्याच ताब्यात. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर ऐव्हडा लोड द्यायचा नाही ना. त्यांनी उत्तरेचा कारभार पाहायचा की दक्षिणेचा पहायचा असा उपरोधिक सवाल घोगरे यांनी केला.
▪️चौकट
नवरीचे शॉपींग ६० लाखांचे होतेय !
काल बातमी ऐकली की साठ हजार रूपये सापडले. साठ हजार म्हणजे साठ लाख रूपये आहेत का ? साठ लाखाचं नवरीच्या लग्नाचं शॉपींग होतंय. ३० हजार रूपये ब्युटीपार्लरला लागतात. साठ हजाराचा डांगोरा पिटण्याची काय गरज होती. तुमचे कोटीने खर्च. दुसऱ्यावर बोट ठेऊन रडीचा डाव सुरू केला असल्याचे घोगरे म्हणाल्या.