भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये शिक्षणदूत अभियानाचा प्रारंभ
परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडलेल्यांना रात्र शाळेच्या माध्यमातून पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा उपक्रम
दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे काम रात्रशाळा करत आहे -डॉ. पारस कोठारी
अहमदनगर (प्रतिनिधी)- परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना रात्र शाळेच्या माध्यमातून पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने हिंद सेवा मंडळ संस्थेच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलने शिक्षणदूत अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. रात्र शाळेतील विद्यार्थी शिक्षणदूत म्हणून समाजात शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना रात्र शाळेत आणण्याचे काम करण्याची ही संकल्पना आहे.
या अभियानाचा प्रारंभ रात्र शाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांच्या उपस्थितीमध्ये झाला. यावेळी प्राचार्य सुनील सुसरे, शिक्षक महादेव राऊत, अमोल कदम, शिवप्रसाद शिंदे, बाळू गोरडे, कैलास करांडे, अनिरुध्द देशमुख, अनिरुध्द कुलकर्णी, अविनाश गवळी, कैलास बालटे, महिला शिक्षिका वैशाली दुराफे, वृषाली साताळकर आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. पारस कोठारी म्हणाले की, भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये गेल्या 72 वर्षापासून शिक्षणात खंड झालेल्या, शिक्षणापासून वंचित राहिलेल्या शाळाबाह्य, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांनी प्रवेशित होऊन आपला शैक्षणिक स्तर उंचावलेला आहे. अनेक विद्यार्थी रात्र शाळेत शिक्षण घेऊन सक्षमपणे रोजगार करत असून, त्यांनी आपली प्रगती साधली आहे. दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पंखात शिक्षणाने बळ निर्माण करण्याचे काम ही रात्रशाळा करत आहे. आजही अनेक शाळाबाह्य विद्यार्थ्यांना रात्र शाळा ही संकल्पना माहित नाही. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रात्र शाळेतील 55 विद्यार्थ्यांनी शिक्षणदूत होण्यासाठी पुढाकार घेतला असून, हे विद्यार्थी त्यांच्या भागातील शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांना रात्र शाळेत आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. भाई सथ्था नाईट हायस्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता आठवी ते बारावी 504 विद्यार्थी (विद्यार्थी 264 व विद्यार्थिनी/महिला 240)प्रवेशित झाले आहेत. दिवसा अर्थार्जन रात्री ज्ञानार्जन करण्याची संधी शहरातील सर्व गरजवंतांना उपलब्ध होत आहे. सोबतच मासूम संस्थेच्या (मुंबई) वतीने रात्र शाळेत प्रवेशित होऊन शैक्षणिक स्तर उंचावणाऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी (शिष्यवृत्ती)आर्थिक मदत देण्यात येते. आज अखेर मासूम संस्थेच्या वतीने फॅशन डिझायनिंगसाठी 12 विद्यार्थी (शिष्यवृत्ती प्रत्येकी 48 हजार रुपये) डीएमएलटी साठी 03 विद्यार्थी (शिष्यवृत्ती प्रत्येकी 54 हजार रुपये) ब्युटी पार्लर साठी 02 विद्यार्थी (शिष्यवृत्ती प्रत्येकी 45 हजार रुपये) या व्यतिरिक्त इतर व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी (शिष्यवृत्तीस) आर्थिक मदतीस पात्र झालेले असल्याची माहिती प्राचार्य सुनील सुसरे यांनी दिली.
भाई सथ्था नाईट हायस्कूल मध्ये शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देखील दिले जात असून, यासाठी जन शिक्षण संस्था, सिद्धी प्यारा मेडिकल, इंडियन अकॅडमी ऑफ फॅशन डिझायनिंग, ट्राय लॉजिक सॉफ्ट सोल्युशन, ऐ.पी. प्रा.लि. (एमआयडीसी), ग्लोबल रिच स्किल ट्रेनिंग इंडिया प्रा.लि हे रात्र शाळेशी जोडल्या गेल्या आहेत.शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करणारे शरद पवार, मंगेश भुते, पी.एच. शिंदे, ए.सी. ओमकार भिंगारदिवे, महिला शिक्षिका स्वाती होले मॅडम, विद्यार्थी शुभम पाचरणे यांना डॉ. कोठारी व शालेय समितीचे सदस्य विलास बडवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस. शिंदे व गाडगीळ यांनी केले. या उपक्रमास शिक्षण विभाग व संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अनंत फडणीस, मानद सचिव संजय जोशी,जेष्ठ मार्गदर्शक अजितशेठ बोरा व सर्व संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या.