मनिषा गायकवाड यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्कार जाहीर
शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मनिषा प्रफुल्ल गायकवाड यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पाचव्या काव्य संमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. या काव्य संमेलनात पाहुण्यांच्या हस्ते गायकवाड यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती काव्य संमेलनाचे आयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.
मनिषा गायकवाड या भिंगार हायस्कूलमध्ये पर्यवेक्षिका असून, सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करत आहे. महिला सक्षमीकरणाचे कार्य करुन गरजू महिलांना दिशा देण्याचे कार्य करत आहे. तर विविध सामाजिक व धार्मिक क्षेत्रात त्यांचा पुढाकार असतो. या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.