नीलेश भाऊच्या पुढे मी ढाल म्हणून उभी राहील ! सुप्रिया सुळे यांचे अजित पवार यांना प्रत्युत्तर

नीलेश भाऊच्या पुढे मी ढाल म्हणून उभी राहील !

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांचे अजित पवार यांना प्रत्युत्तर

सुसंस्कृत महाराष्ट्रात दमदाटी चालणार नाही

सुळे यांचा इशारा

ढवळपुरी येथे प्रचार सभा

ढवळपुरी : प्रतिनिधी

पारनेरला झालेल्या सभेत नीलेश भाऊंना दमदाटी करण्यात आली. सुसंस्कृत महाराष्ट्रात दमदाटी चालणार नाही असा इशारा देतानाच हे खपवून घेतले जाणार नाही. नीलेश भाऊंच्या पुढे मी ढाल म्हणून उभी राहिल अशी ग्वाही खा. सुप्रिया सुळे यांनी दिली.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत सुळे बोलत होत्या. यावेळी सक्षणा सलगर, संपत म्हस्के, किसनराव लोटके, जयंत वाघ, राजेंद्र फाळके, संभाजी रोहोकले, सुवर्णा धाडगे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या, कसली दमदाटी ? दमदाटीला कोणी घाबरत नाही. आजच्या सभेत त्यांचे भाषण सुरू होते एक जण म्हणाला की रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ! हेच समाजमन आहे. आदरयुक्त भिती असलीच पाहिजे. जे वयाने मोठे आहेत त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. हे आमचे संस्कार आहेत. पण दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही. जे नीलेश लंके यांना दम देत आहेत ना त्यांना मला नम्रपणे सांगायचे आहे की दमदाटी तुमच्या घरात करा. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये दमदाटीचा अधिकार कुणालाही नाही. प्रेमाने बोला आदर सत्कार करू. काल ऐकले की आरे ला कारे म्हणावंच लागतं. हे खपवून घेतलं जाणार नाही. नीलेश भाउला कोणी दमदाटी केली ना ढाल म्हणून सुप्रिया सुळे त्याच्या समोर उभी राहिल असा इशारा सुळे यांनी दिला.

सुळे म्हणाल्या, कांद्याला भाव मिळावा यासाठी मी आणि डॉ. अमोल कोल्हे संसदेत भांडलो. त्यामुळे आमचे निलंबन करण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले. तुमचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून आंदोलन केले ? भाजपा सरकारने एका उद्योगपतीचे १० हजार कोटी रूपये माफ केले शेतकऱ्याकडे मात्र दुर्लक्ष केले. भविष्यात आपलेच सरकार सत्तेत येणार आहे. पारनेरमधून आमची मागणी ही राहील की १ हजार कोटी रूपये उपलब्ध करून शेतकऱ्याची सरकट कर्जमाफी करावी. कांद्याची निर्यात तात्काळ सुरू करण्यात येईल. एकीकडे पाकिस्तानचा कांदा जगात चालला आहे तर दुसरीकडे भारतातला कांदा सडतो आहे याला जबाबदार कोण असा सवाल सुळे यांनी केला.

▪️चौकट

त्यांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे

आपण त्यांच्यासोबत गेलो नाही हे चांगले झाले कारण आज कोणत्या तोेंडाने मते मागितली असती ? कांद्याला भाव नाही या लोकांनी आपल्याला कांदे फेकून मारले असते. जे आज तुमच्याकडे मते मागत आहेत त्यांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे असे सांगत सुप्रिया सुळे यांनी खा.डॉ. सुजय विखे यांच्यावर नाव न घेता टिकास्त्र सोडले.

▪️चौकट

लोकसभेत लंके फॅक्टर गाजणार

घरात बसणार फेक डॉक्टर आणि लोकसभेत गाजणार लंके फॅक्टर ! असे सांगत सेनापती बापट यांच्यानंतर या तालुक्यातून स्वाभिमानाची तुतारी फुंकण्यासाठी नीलेश लंके हा पठ्ठया तयार असल्याचे सक्षणा सलगर यांनी सांगितले.

▪️चौकट

पोराचं कर्तुत्व पहावं की सासऱ्याची संपत्ती ?

ज्यावेळी सुप्रियाताई संसदेत बोलत होत्या त्यावेळी सुजय विखे कुठे लपून बसले होते ? त्यांना किती वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला ? खासदार म्हणून गावागावांमध्ये ते किती वेळा आले, त्यांनी किती प्रश्‍न सोडविले ? केवळ स्व. बाळासाहेब विखे यांचा वारसा सांगायचा, सहकार महर्षींचा नातू असल्याचे सांगायचे. आणि मोदींकडे पाहून मतदान करा असे सांगितले जातेय. पोरगी देताना सासऱ्याची संपत्ती पाहून दिली जातेय का ? पोराचं कर्तुत्व पाहता की नाही ? हे असे झालंय पोराकडं पाहूच नका, सासऱ्याकडे पहा ! असे चालेल का ? उमेदवाराची गुणवत्ता काय ? विखे नाव सोडले तर पाच माणसे ओळखणार नाहीत. कोरोनाचा डॉक्टर म्हणून नीलेश लंके यांना अवघा महाराष्ट्र ओळखत असल्याचे सक्षणा सलगर म्हणाल्या.

▪️चौकट

कोण गद्दार, कोण खुद्दार जनता ठरवेल

अजितदादांचं भाषण ऐकूण मला दुःख झाले. याला पाडतो, त्याला पाडतो. त्यांनी पाडापाडीचे कॉट्रॅक्ट घेतलंय काय ? दादा हे बरोबर नाही. मला तुमचा आदर होता, आदर आहे. परंतू तुम्ही जी भाषा वापरताय. अमोल कोल्हेंना पाडतो, अशोक पवारांना म्हणाले तुझी आवकात नाही, हा भाषा आहे का ? कोणी लाख गरीब असो कोणी कोणाची औकात काढायची नसते. तु तुझ्या घरी सोन्याहून पिवळा, मी माझ्या घरी कोळश्याहून काळा. महाराष्ट्राच्या जनतेने ठरविले आहे, गद्दार कोण आणि खुद्दार कोण ते. पवार साहेबांसारख्या ८४ वर्षांच्या योध्याला नामोहरम करण्यासाठी तुम्ही अमित शहा यांच्या टोळीमध्ये सहभागी झाला आहात असा आरोप सक्षणा सलगर यांनी केला.

▪️चौकट

अब प्रजाका बेटा राजा बनेगा !

चौंडी येथे धनगर बांधव उपोषणाला बसले होते ऑगस्ट २०२४ मध्ये. १५ दिवस उपोषण सुरू होते. खासदार विखे उपोषणकर्त्यांकडे एकदाही गेले नाहीत. ती माणसं नाहीत का ? ती मेंढरं आहेत का ? आम्ही मेंढरं पाळणारी माणसं आहोत. मला त्याचा अभिमान आहे. तुम्ही का विचारण्यासाठी आले नाहीत. आम्ही माणसं नाहीत का ? अब राजा का बेटा राजा नही बनेगा प्रजाका बेटा राजा बनेगा.

सक्षणा सलगर
प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी युवती काँग्रेस

▪️चौकट

धनगर बांधवाला कुत्र्यासारखं मारलं

राधाकृष्ण विखे मोठे नेते आहेत. सोलापूर येथे धनगर बांधव भेटण्यासाठी आले होते. आमच्या धनगर बांधवाने त्यांच्या डोक्यावर भंडारा टाकला तर त्याला कुत्र्यासारखं मारण्यात आलं. त्याचं उत्तर १३ तारखेला मतदानातून कळेल.

▪️चौकट

तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य हवे

आपण या निवडणूकीत विजयी होणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. आता तालुक्या-तालुक्यांमध्ये मताधिक्क्याची स्पर्धा लागली आहे. असे असताना पारनेर तालुका मागे राहिला तर त्याची सल माझ्या मनात राहणार आहे. कारण जो तालुका सर्वाधिक मताधिक्य देणार त्या तालुक्यात विजयी सभा घेण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्याचे मताधिक्य सर्वाधिक राहिल यासाठी प्रत्येकाने जीवाचे रान करावे.

नीलेश लंके
उमेदवार

▪️चौकट

तालुक्याच्या स्वाभिमानासाठी ढवळपुरीकर एकत्र

ढवळपुरी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत एकमेकांविरोधात लढलेले डॉ. राजेश भनगडे, भागानाना गावडे, सुखदेव चितळकर हे लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने मतभेद विसरून तालुक्याच्या स्वाभिमानासाठी एकत्र आले. ढवळपुरीचा हा विचार प्रत्येक गावागावात पोहचला पाहिजे. तालुक्यात राष्ट्रवादी व शिवसेना अशी विचारसरणी आहे. या दोन्ही विचारसरणीही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणूकीत एकत्र आलेल्या असल्याने आपल्या तालुक्याचे मताधिक्य एक लाखांपेक्षा अधिक असले पाहिजे अशी अपेक्षा लंके यांनी व्यक्त केली.

▪️चौकट

म्हणून मी गुंड !

मी विखे-पिता पुत्रांचे ऐकत नाही. त्यांच्याशी राजकीय तडजोड करत नाही त्यामुळे माझ्यावर गुंडगिरीचा आरोप केला जातोय. मी कधी गुंडगिरी केली ? कोणत्या गोरगरिबांवर अन्याय केला ? एखाद्या गरीबावर, सर्वसामान्य व्यक्तीवर अन्याय झाला तर त्याच्याशी दोन हात करण्याची आपली तयारी असते. आपला तालुका स्वाभिमानी आहे. मोठयाला खेटण्याची आपणास सवय आहे. समोरच्या पहिलवानाला दोन ते अडीच लाख मतांनी मी पराभूत करणार असल्याचा विश्‍वास लंके यांनी व्यक्त केला.

▪️चौकट

देवदूताला मतदान करण्याची संधी

कोरोना संकटात खानदेशातील अनेक रूग्ण भाळवणीच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराकडे येत होते. चौकशी केली असता त्या लोकांनी सांगितले की तिथे एक देवदूत आहेत. त्यानंतर आपणही या सेंटरला भेट दिली असता नीलेश लंके हे स्वतः रूग्णांची सेवा करत होते. त्यावेळी वाटले आमदार असावा, नेता असावा तर नीलेश लंके यांच्यासारखा. अशा देवदूताला लोकसभेत पाठविण्याची संधी आपणास मिळाली आहे. त्यांना भरभरून मतदान करावे.

शुभांगी पाटील
शिवसेना उपनेत्या

▪️चौकट

सर्वाधिक मताधिक्य द्या

कोरोना काळात जीवाची पर्वा न करता नीलेश लंके यांनी काम केले. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने आपल्या तालुक्याला मोठी संधी लाभली असून या संधीचे सोने करायचे आहे. आपल्या तालुक्याच्या स्वाभिमानाचा प्रश्‍न आहे. गावपातळीवरील वाद दूर ठेवा गावागावांतून लंके यांना सर्वाधिक मताधिक्य द्यावे.

प्रियंका खिलारी
शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख

▪️चौकट

आपलं ते आपलंच पोरगं

नीलेश लंके यांनी कधीही गरीब-श्रीमंत असा भेदभाव केला नाही. प्रत्येक माणूस माझा आहे ही भावना ठेऊन त्यांनी काम केले आहे. दुसऱ्याची पोरं किती दिवस अंगाखांद्यावर खेळविणार ? दुसऱ्याचं पोरगं ते दुसऱ्याचंच असते. कधीतरी ते द्यावंच लागतं. आपलं ते आपलंचे असतं. पाणी पाजायला आपलंच पोरगं लागतं. हक्काचं पोरगं म्हणजे नीलेश लंके असून त्यांना मोठया मताधिक्क्याने संसदेत पाठवायचे आहे.

सुवर्णा धाडगे
राष्ट्रवादी महिला आघाडी तालुकाध्यक्ष

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles