सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयामध्ये रोजगार मेळावा संपन्न
सामाजिक कार्य करणाऱ्या १४ संस्थांचा सहभाग, एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के प्लेसमेंटसाठी कॅम्पस इंटरव्ह्यू
प्रतिनिधी:
बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी सामाजकार्य व संशोधन संस्थेमार्फत एमएसडब्ल्यूच्या द्वितीय वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यामध्ये जवळपास ९५ विद्यार्थी सहभागी झाले होते. सामाजिक कार्य करणाऱ्या १४ नामांकित संस्थांचे इंटरव्ह्यू एकाच छत्राखाली आयोजित करण्यात आले होते.
यात प्रामुख्याने पुणे येथील महिला सक्षमीकरणावर कार्य करीत असलेले चैतन्य फाउंडेशन, संगमनेर येथील समुदाय आरोग्य व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे लोकपंचायत संस्था, बॅगलोर येथील महिला विकासासाठी कार्यरत हॅन्ड इन हॅन्ड संस्था, पुणे येथील आदिवासी विकास व बाल संरक्षण क्षेत्रातील संपर्क संस्था, मुंबई येथील आरोग्य व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे समता फाउंडेशन, महाराष्ट्र स्तरावर कौशल्य विकासासाठी कार्यरत असणारे प्रथम स्किल डेव्हलपमेंट सेंटर, पुणे येथील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, प्लेसमेंट एजेन्सी म्हणून कार्यरत असणारे पुणे येथील इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट, समुदाय आरोग्य व मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत असणारी जामखेड येथील सीआरएचपी संस्था, अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या माध्यमातून कार्यरत असणारे अनमोल फाउंडेशन, भटक्या व वंचित समूहाच्या बालकांच्या शिक्षण व संरक्षणासाठी पुणे, औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असणारे वंचित विकास संस्था, अहमदनगर येथील बाल संरक्षणासाठी कार्यरत असणारी स्नेहालय संस्था, पुणे येथील शिक्षण क्षेत्रात वाचन चळवळ राबविणारी अक्षर भारती सेवा इंटरनॅशनल, अहमदनगर येथील आरोग्य सेवा देणारे पद्मश्री विखे पाटील हॉस्पिटल, अशा नामांकित संस्था प्रतिनिधीनी प्रत्यक्ष हजर राहून विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतले अशी माहिती सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी दिली. इंटरव्ह्यूपूर्वी सुरवातीला प्रत्येक संस्था प्रतिनिधीनी आपल्या संस्थेची ओळख व नोकरीच्या रिक्त जागा याबाबत माहिती दिली.
महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाच्या पुढाकाराने पार पडलेल्या या कॅम्पस इंटरव्ह्यू बद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत संस्थेचे आभार मानले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्ती पत्र देण्यात येत असल्याचे विविध संस्थांचे अधिकारी यांनी सांगितले. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवडीची संख्या वाढण्याचे कारण म्हणजे संस्थेचे प्लेसमेंट ऑफिसर वैशाली पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लेसमेंट विभागाने घेतलेले प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मुलाखतीचे तंत्र अवगत करण्यासाठी दिलेले प्रशिक्षण त्यातून विद्यार्थ्यांचे सॉफ्ट स्किल विकसित केले गेले. याचा फायदा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी होत असल्याचा अभिप्राय विद्यार्थ्यांनी यावेळी दिला. या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना १०० टक्के प्लेसमेंट देण्याचा प्रयत्न असल्याचे वैशाली पठारे यांनी सांगितले. सदर कॅम्पस इंटरव्ह्यू यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक, कर्मचारी व प्लेसमेंट विभागाचे विदयार्थी प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.