केंद्र शासनाने मल्लखांब खेळाचा सन्मान वाढवला – पद्मश्री उदय देशपांडे
40 व्या राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचे उद्घाटन
पोल व रोप मल्लखांबावर रंगले चित्तथरारक कवायती
अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने मल्लखांब क्षेत्रात अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार देऊन या खेळाचा सन्मान वाढवला. हा सन्मान सर्व मल्लखांबपटूंचा आहे. हा खेळ कॉमनवेल्थ, आशियाई व ऑलिंपिक मध्ये समावेश होण्यासाठी सर्वांपुढे मोठे आव्हान आहे. सर्वांनी एकत्र येऊन हा खेळ पुढे घेऊन जायचा आहे. आपआपसातील मतभेद व गैरसमज दूर करुन समोपचाराने प्रश्न सोडवा. खेळाला बाधा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करु नये, असे आवाहन मल्लखांब खेळातील पद्मश्री उदय विश्वनाथ देशपांडे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 40 व्या राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी पद्मश्री देशपांडे बोलत होते. वाडियापार्क क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सुरु झालेल्या दोन दिवसीय स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी द्रोणाचार्य देवरुखकर, राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष उत्तमराव लटपटे, सचिव श्रेयस म्हसकर, शिवछत्रपती विजेते तथा कोषाध्यक्ष बापूसाहेब समलेवाले, सहसचिव विश्वतेज मोहिते, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, पांडूरंग वाघमारे, अनिल नागपुरे, यशवंत जाधव, ॲड. संजय केकाण, सचिन परदेशी, मोहन झुंजे पाटील, जिल्हा मल्लखांब असोसिएशन अध्यक्ष राजकुमार धोत्रे, कोषाध्यक्ष होनाजी गोडळकर, सचिव अनंत रिसे, राजाभाऊ अवसक, निलेश कुलकर्णी, उपाध्यक्ष नंदेश शिंदे, अमित जिनसीवाले,तांत्रिक समिती सदस्य विष्णु देशमुख,सतीश दारकुंडे, अजित लोळगे, मोहनीराज लहाडे, प्रकाश सोनी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सत्यजीत शिंदे, माया मोहिते, पंकज शिंदे, रविंद्र पेटे, ऋषीकेश अरणकल्ले, सुनिल गंगावने, अभिजीत भोसले आदी उपस्थित होते.
पुढे पद्मश्री देशपांडे म्हणाले की, देशभरात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय स्तरावर मल्लखांबच्या स्पर्धा होत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडू सहभागी होत असतात. खेलो इंडिया या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मल्लखांबचा समावेश करण्यात आला. यामुळे या खेळाला एक वेगळी दिशा मिळाली. परदेशातही या खेळाचे मोठे आकर्षण आहे. परदेशात प्रशिक्षक म्हणून जाण्याची संधी भारतीयांना मिळणार आहे. पॅरिसच्या ऑलिंपिक मध्ये मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे. मल्लखांबचा सन्मान हा खेळाडूंमुळे वाढत आहे. नगरमध्ये ही स्पर्धा होण्या अगोदरच तक्रारी वरुन राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची नोटीस मिळाली. मात्र सर्व अटी, शर्तीची पुर्तता करुन दृष्ट लागावी अशी उत्तम प्रकारे ही स्पर्धा खेळाडूंसाठी पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिल्याच दिवशी मल्लखांब स्पर्धेसाठी राज्यातील 400 पेक्षा अधिक खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक व पालक स्पर्धेच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. 12 व 14 वर्षे आतील मुले व मुलींच्या सकाळ पासूनच पुरलेले मल्लखांब व रौप मल्लखांबावर चित्तथरारक कवायती रंगल्या होत्या. मुला-मुलींनी पोल व रोप मल्लखांबावर चित्तथरारक खेळाचे प्रदर्शन घडवून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेतून शारीरिक लवचिकता व चपळपणाचा उत्कृष्ट खेळ पहावयास मिळाला. तर रोप मल्लखांबावर खेळाडूंनी 10 ते 15 फुट उंचीवर विद्यार्थ्यांच्या विविध धाडसी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या ह्रद्याचा ठोका चुकवला. सकाळ व संध्याकाळच्या दोन सत्रात या स्पर्धा रंगत आहे. खेळाडूंच्या सोयीसाठी नियोजन पुस्तिकांचे अनावरण करुन ते खेळाडूंना वाटप करण्यात आले.
श्रेयस म्हसकर म्हणाले की, अतिशय सुंदर वातावरणात मल्लखांब स्पर्धा होत असून, अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. पालकांनी देखील आपल्या मुलांना स्पर्धेसाठी घेऊन आल्याचा उत्साह दिसून येत असल्याचे सांगितले. अनंत रिसे यांनी 16 वर्षानंतर प्रथमच नगर शहरात मल्लखांबाची राज्यस्तरीय स्पर्धा मोठ्या दिमाखात होत आहे. मल्लखांबचा थरार डोळ्यांनी अनुभवण्यासाठी नगरकरांना उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले. उत्तमराव लटपटे यांनी उन्हाळ्यातही या स्पर्धेचे उत्तम प्रकारे नियोजन करण्यात आले असून, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा संजीवनी ठरणार असल्याचे स्पष्ट केले. द्रोणाचार्य देवरुखकर यांनी मल्लखांबकडे फक्त स्पर्धा म्हणून न पाहता हा देशातील प्राचीन खेळ असून, मल्लखांबाचे 40 विविध प्रकार आहे. त्याची देखील खेळाडूंना माहिती घेणे अपेक्षित असल्याचे सांगितले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमदार संग्राम जगताप व उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचे सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदेश शिंदे यांनी केले. आभार राजकुमार धोत्रे यांनी मानले.