महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचा दहावीच्या बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकाल
78 मुली विशेष प्राविण्याने उत्तीर्ण
नक्षत्रा ढोरसकर 97 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम
अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा 100 टक्के निकाल लागला. विद्यालयातील 78 मुली विशेष प्राविण्याने व 43 मुली प्रथम श्रेणीत तर 5 द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. नक्षत्रा अमित ढोरसकर हिने 97.20 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली. पूर्वा अमित ढोरसकर 95 टक्के गुण मिळवून दुसरी व प्रांजल मच्छिंद शिंदे 94.80 गुण मिळवून तिसरी आली.
तसेच शाळेचा इ.12 वी चा निकाल 90 टक्के लागला आहे. विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव बबनराव कोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. कोतकर म्हणाले की, मुली या शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असून, आपले कर्तृत्व सिध्द करत आहे. परंतु अजून देखील अनेक ठिकाणी मुलींना जी मदत पाहिजे ती प्राप्त होत नाही. मुलगी आहे म्हणून, तिला दुय्यम दिला जातो, ग्रामीण भागात घरची परिस्थिती बिकट असताना मुलींना शाळेतून काढण्यात येते. अशा परिस्थितीत मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुलींशी संवाद साधून त्यांना विद्यालयाकडून लागेल ती मदत दिली जात आहे. विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागून व आपल्या विद्यालयाची मुलगी केडगावात प्रथम आल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यालयाच्या प्राचार्या वासंती धुमाळ यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे व गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती गुंड यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश गवळी, सचिव बबनराव कोतकर, सहसचिव रावसाहेब सातपुते, खजिनदार प्रल्हाद साठे, कार्यकारी संचालक जयद्रथ खाकाळ, डॉ. सुभाष बागले, संचालक जासूद सर, दगडू साळवे आदींसह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.