आष्टी प्रतिनिधी – रामदास स्वामींच्या हस्ते प्रतिष्ठातिप हनुमान मूर्ती असलेलं दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे अगदी विरळ पहावयास मिळतात.पिंपरी(घाटा) येथे असे मंदिर असून ते जागृत देवस्थान आहे.गांवकरी व परिसरातील हनुमान भक्तांचं ते श्रद्धास्थान आहे.
उद्या दि.१६ एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने आज आणि उद्या असा दोन दिवस हा यात्राउत्सव सुरू असणार आहे.कोरोनामुळे दोन वर्षे हा उत्सव बंद होता.कोरोनासारख्या जिवघेण्या आजारात गावात कसलीही जिवितहानी या आजारामुळे झाली नाही.त्यामुळे गांवक-यांत कमालीचा उत्साह आहे.
गावातील तरुणांनी श्री.क्षेत्र पैठण व नागतळा येथून कावडीने पायी चालत आणलेलं तिर्थ(पाणी) हे मुर्तिला वाहण्यात येते.त्यामुळे त्या कावडींची भव्य मिरवणूक,हनुमानजींच्या चांदीच्या मुखवट्याची मिरवणूक आज पारंपरिक वाद्यांच्या नादात होत असते.हा छबिना खेळीमेळीच्या वातावरणात होत असतो.अबालवृद्ध,महिलावर्ग,भाविक रात्रभर या मिरवणूकीत सहभागी होत असतात.
दि.१६ एप्रिल रोजी पहाटे सूर्योदयाचा हनुमान जन्मोत्सवानिमित्त कीर्तन,भजन होत असून त्यानंतर शेरणी वाटप व महिला भाविकांचे दंडवत असणार आहेत.दिवसभराच्या यात्रेनंतर दुपारी ३ वाजता शाहीरी पोवाडे व कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे.मंदिराला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून विद्युत रोषणाईची सजावट लक्ष वेधून घेत आहे.
ग्रामस्थांकडून यात्राउत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून हा उत्सव शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडावा यासाठी गावातील तरुण वर्ग,सरपंच,उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य,पंच कमिटी व सर्व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
या सर्व कामी अंभोरा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री.बेंबरे साहेब,देशमाने साहेब व स्टाफ यांचे सहकार्य लाभणार आहे.