अहमदनगर ,प्रतिनिधी
असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज (आमी) आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय नेप्ती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्यास युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नेप्ती (ता. नगर) येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये हा रोजगार मेळावा पार पडला.
या रोजगार मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हूणन आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ व उपाध्यक्ष महेश इंदानी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी महाविद्यालयात पार पडलेल्या भव्य रोजगार मेळाव्यामधून युवक-युवतींना रोजगाराच्या संधी मिळणार असून, तर औद्योगिक क्षेत्रात असलेली गरज त्यांच्या लक्षात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी असे अनेक उपक्रम महाविद्यालयात सातत्याने राबविण्यात येत असून, भविष्यात देखील हे उपक्रम सुरु राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जयद्रथ खाकाळ म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात रोल मॉडेल समोर ठेवावा व त्या दिशेने पुढे जाण्यासाठी त्यांचे व आपल्या वरिष्ठाचे मार्गदर्शन घ्यावे. शिक्षण पूर्ण केल्यावर मोठया कंपनीत जॉब भेटण्याची अपेक्षा असते, पण मिळत नाही. त्यासाठी आपण छोटया कंपनीपासून सुरुवात करून अनुभव घेतला पाहिजे.
तुमच्याकडे अनुभव असेल तर कंपन्या तुमच्या मागे येतील. स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर सरकारने अनेक योजना उपलब्ध करुन दिल्या असून, त्याचा लाभ घ्यावा. प्रामाणिक काम करा आणि कोणत्याही कंपनीत काम करताना स्वतःची असल्या सारखे काम केल्यास यश नक्की मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महेश इंदानी म्हणाले की, भारताच्या जेडीपी मध्ये सर्वात मोठा वाटा युवकांचा आहे. मी देशासाठी काय करू शकतो? याला महत्त्व देऊन काम केल्यास भविष्यातील वाटचाल उज्वल राहणार आहे. उद्योजक क्षेत्रात अनेक संधी असून, योग्य दिशेने पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या रोजगार मेळाव्यात अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन क्षेत्रातील 89 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 15 इंडस्ट्रीजनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना विविध पदावर नियुक्त्या केल्या. यावेळी रिटेलवेयर या कंपनीचे नवनाथ लंके, सिद्धी ग्रुपचे एम.एल. बोचरे, पोलाद स्टीलचे आशिष भाबडा यांच्या समवेत विविध कंपनीचे एच.आर. उपस्थित होते. ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट अधिकारी म्हणून प्रा. एस. एम. वाळके यांनी काम पाहिले. तसेच रोजगार मेळावा यशस्वी होण्यासाठी समन्वयक प्रा.ए.आर. माने, प्रा. एम.पी. आठरे, प्रा. जी.बी. साळुंके, प्रा. पी.डी. कोतकर आदींसह सर्व विभागप्रमुख व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अक्षय देखणे यांनी केले. आभार प्रा. शिल्पा वाळके यांनी मानले.