अध्यात्म आत्मसात केलेला तरुण जग जिंकायला निघतो – डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे
गणराज प्रकाशनाच्या अध्यात्मिक विरासत ग्रंथाचे प्रकाशन
अहमदनगर (प्रतिनिधी) – जो तरुण अध्यात्म आत्मसात करतो, तो जग जिंकायला निघतो. अध्यात्मात मोठी शक्ती असून, मन प्रबुद्ध होते. अध्यात्मिक व्यासंग अखंड भारताचा विषय आहे. भारत हा अध्यात्माने जगाला दिशा देत असल्याचे प्रतिपादन लोक साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी केले.
लेखिका सुमन अशोक आल्हाट लिखित अध्यात्मिक विरासत या गणराज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळ्याप्रसंगी डॉ.सहस्त्रबुद्धे बोलत होते. शहराच्या स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी लेखिका सुमन आल्हाट, अशोकराव आल्हाट, प्रकाशक प्रा. गणेश भगत, जालिंदर बोरुडे, बिडवे, संजय भिंगारदिवे आदींसह साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे सहस्त्रबुद्धे म्हणाले की, परकीयांनी भारतीय संस्कृतीवर घाला घातला, हा इतिहास आहे. मात्र नवीन इतिहास घडविण्यासाठी साहित्याचे मोठे योगदान ठरत आहे. परकीय आले आणि या मातीत मिसळून गेले, ही या देशाची परंपरा आहे. भारतीय अध्यात्मिक वारसा नव्याने पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रारंभ भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा. गणेश भगत यांनी उत्तम लिखाण असलेल्या नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम गणराज प्रकाशन करत आहे. समाजाच्या पोटात दडलेले साहित्य नव्याने सर्वांसमोर आणण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सुमनताई व अशोक आल्हाट यांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
चंद्रकांत पालवे यांनी अध्यात्माचा मांडलेला विषय हा युवकांना व नवीन पिढीला दिशा देणारा ठरणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिराज भगत यांनी केले. आभार अशोक आल्हाट यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शामा मंडलिक, अरविंद ब्राह्मणे, सखाराम गोरे, पल्लवी भोसले आदींनी परिश्रम घेतले.