संस्था १०० दिव्यागांना करणार साथी चप्पल उत्पादनातून स्वयंपूर्ण
अहमदनगर प्रतिनिधी – लॉकडाऊन,अतिवृष्टी या संकटामुळे सर्व अर्थकारण ठप्प झाले.यामुळे अनामप्रेम च्या दिव्यांग यांनी संस्था व होतकरू दिव्यांग घटक यांना स्वयंपूर्ण करण्याचा विडा उचलला.
दिव्यांगत्वाला पूरक जे उद्योग व्यवसाय आहेत, त्याचा संस्था सातत्याने शोध घेत होती.यातून साथी चप्पल उद्योग साकारला.

अनामप्रेमच्या कौशल्य विकासालय प्रकल्पाद्वारा मागील दोन महिन्यांत उच्च गुणवत्तेच्या,दर्जेदार ३० प्रकारच्या चप्पल बनवण्यात आल्या.
अहमदनगर एम.आय.डी. सी. मधील प्रयोगशील व्यक्तिमत्त्व अविहास इलेक्ट्रॉनिकल्स चे अविनाश बोपर्डीकर यांनी अनामप्रेम च्या दिव्यांग यांना साथी चप्पल उद्योगाबाबत स्फूर्ती दिली.
श्री.बोपर्डीकर यांनी उद्योगासाठी आवश्यक ३ लक्ष रुपयांची चप्पल बनवण्याची मशिनरी अनामप्रेमला देणगी दाखल दिली.अनामप्रेम च्या सत्यमेव जयते ग्राम, रवीनंदा संकुलात कौशल्य विकास प्रकल्पात चप्पल उद्योग सुरू झाला.
साथी चप्पल
पुणे येथील अनामप्रेम च्या कार्यकर्त्या दीप्तीताई सोंदे यांनी साथी चप्पल हे या उद्योगाला नाव दिले. दिव्यांग आणि समाज यांनी एक साथ येऊन दिव्यांगांच्या पुनर्वसनाचा संकल्प केला तर अनेक दिव्यांग यांचे पुनर्वसन होऊ शकते हा साथी हे नाव देण्यामागे उद्देश संस्थेने ठेवला आहे.
अनामप्रेमचे कार्यकर्ते विक्रम प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक प्रजापती,रवी कंठाळे, अनिकेत कांबळे, प्रतिभा जगताप या दिव्यांग टीम ने विविध ३० प्रकारच्या नाविन्यपूर्ण चप्पल बनवल्या आहेत.
विक्री केंद्रातून दिव्यांगांना मिळेल रोजगार
अनामप्रेमच्या साथी चपला विक्री करणारी दिव्यांग यांची साखळी निर्माण करण्याचे संस्थेने योजले आहे. बाजारू दरात विक्रीस उपलब्ध असणाऱ्या या चपला विक्रीतून अपंग यांना रोजगार मिळणार आहे.
नगर जिल्ह्यातील बेरोजगार अपंग यांना अत्यंत माफक बीज भांडवलातून हा चप्पल विक्री व्यवसाय सुरू करता येणार आहे.अनामप्रेम चे अध्यक्ष अजित माने व उद्योजक अभय रायकवाड यांच्या अभ्यास गटाने मांडलेल्या सर्वेक्षणातून हे साथी चप्पल विक्री केंद्र ग्रामीण भागात शेकडो अपंग यांना रोजगार मिळवून देणार आहे.
अनामप्रेम च्या गांधी मैदान प्रकल्पात पहिले विक्री केंद्र
अनामप्रेम च्या नगर शहरातील गांधी मैदान,स्नेहालय भवन मागे,अहमदनगर येथे पहिले चप्पल विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे रोज ६ तास विविध ३० प्रकारच्या चपला विक्री केल्या जात आहेत.
अहमदनगर एम.आय.डी. सी. क्लस्टर चे उद्योजक मिलिंद कुलकर्णी, उद्योजक राजीव गुजर, स्नेहालय चे अध्यक्ष संजय गुगळे, अनामप्रेम चे अध्यक्ष अजित माने, उद्योजक अभय रायकवाड, अजित कुलकर्णी यांनी या केंद्राचे उदघाटन केले.
दिव्यागांना मदत करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने अनामप्रेम ची साथी चप्पल घ्यावी असे आवाहन अनामप्रेम चे जेष्ठ कार्यकर्ते जुगल मंत्री, उमेश पंडुरे, विष्णू वारकरी यांनी केले आहे.