मराठा आरक्षणावर बेताल वक्तव्य करणार्या काँग्रेसच्या मंत्रीला आवरा – संभाजीराजे दहातोंडे
जिल्ह्यातील पदाधिकारी यांची बैठक
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाची भूमिका काय? यासंदर्भात संपुर्ण राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा सुरु आहे. मात्र राज्यातील काही राजकीय मंत्री मराठा आरक्षणाला विरोध करीत आहे. अशा मंत्र्याच्या विरोधात मराठा महासंघाच्या वतीने ठोस भूमिका घेण्यात येणार आहे. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार मराठा आरक्षणावरुन बेताल वक्तव्य करीत आहे. यामुळे दोन समाजात दरी निर्माण केली जात आहे. हे बेताल वक्तव्य काँग्रेसच्या दृष्टीने धोक्याचे असल्याचे सुचक वक्तव्य अखिल भारतीय मराठा महासंघाचे नवनिर्वाचित उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील यांनी केले. तर वडेट्टीवार यांचे बेताल वक्तव्य न थांबल्यास थेट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घरावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.
पुढे बोलताना दहातोंडे पाटील म्हणाले की, सत्तेसाठी राजकारण नसून, मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करत आहे. मराठा महासंघाच्या स्थापनेला 120 वर्षे झाले असून, रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. मराठा महासंघाच्या मुख्य कार्यालयाची मुंबई, गीरगावला इमारत बांधली जात असल्याची माहिती दिली. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आलेली जबाबदारी निश्चितपणे पेळवली जाणार आहे. मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रा. शशिकांत पवार यांनी मोठा विश्वास दाखवून महत्त्वाच्या जबाबदार्या सोपविल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत संभाजीराजे दहातोंडे पाटील यांची राज्य संपर्कप्रमुख तसेच उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात गंगाधर बोरुडे यांनी मागील वीस ते पंचवीस वर्षापासून संभाजीराजे दहातोंडे मराठा महासंघात सक्रीयपणे योगदान देत आहे. जिल्हाध्यक्ष ते शेतकरी मराठा महासंघाचे राज्याध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेळवली. समाजातील अनेक कार्यकर्ते त्यांनी सक्रीय करुन घेतले. शेतकरी मराठा महासंघाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात भरीव कार्य केले. त्यामुळे मराठा महासंघाने त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. सध्या त्यांच्याकडे मराठा महासंघाच्या तीन महत्त्वाच्या जबाबदार्या देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.