अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील सहा आरोपींची निर्दोष मुक्तता
अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणातील सहा आरोपींची जिल्हा न्यायालयाचे निर्दोष मुक्तता केली. मागील झालेल्या भांडणाच्या कारणावरून हा खोटा गुन्हा आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
26 सप्टेंबर 2021 राहुरी तालुक्यात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला मुख्य आरोपीने तिला तिची हरवलेली आई ही एका घरात असल्याचे सांगून, त्या अल्पवयीन मुलीला त्या घरात नेले व त्या मुलीवर अत्याचार केला. आरोपीच्या घरचे व इतर आरोपींना त्या अल्पवयीन मुलीच्या घरच्यांना घटनेबद्दल कोणाला सांगू नका, तसेच मुलगी गरोदर राहिल्यास आम्ही सर्व खर्च करू अशा धमक्या दिल्याचे आरोप सदरील सहा आरोपींवर केले होते. त्या अनुषंगाने सदर घटनेची फिर्याद त्या अल्पवयीन मुलीने राहुरी पोलीस स्टेशन येथे दिली. सदर गुन्ह्याचा सखोल तपास करुन मुख्य आरोपीला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपासांती आरोपीविरुद्ध विशेष सत्र न्यायालय अहमदनगर येथे दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाने आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकामी एकूण 9 साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्या. त्यामध्ये पीडीतीची साक्ष सर्वात महत्त्वाची होती. आरोपींच्या वतीने ॲड. परिमल फळे यांनी साक्षीदाराचे उलट तपास घेतले. त्यामध्ये ॲड. फळे यांनी पीडितेचा घेतलेला उलटतपास, पीडितेच्या काकांचा व वैद्यकीय अधिकारी यांचा घेतलेला उलटतपास महत्त्वाचा ठरला. आरोपीतर्फे ॲड. फळे यांनी हा गुन्हा त्यांच्या आशीलांनी केलेला नसल्याचा तसेच फक्त मागील झालेल्या भांडणाच्या कारणावरून हा खोटा गुन्हा आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेला असल्याचा बचाव घेतला.
या प्रकरणातील साक्षीदारांचे उलटतपास व न्यायालया समोर केलेला युक्तीवाद विशेष सत्र न्यायाधीश एम.एच. मोरे यांनी ग्राह्य धरून आरोपीची निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्या कामी ॲड. परिमल फळे यांना ॲड. सागर गायकवाड, ॲड. अभिनव पालवे, ॲड. आनंद कुलकर्णी, ॲड. डोके, ॲड. लांडगे, ॲड. आशिष पोटे व अक्षय कुलट यांनी सहाय्य केले.