अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व रोटरी प्रियदर्शनीच्या वतीने आयोजित कोविड काळानंतरचे शिक्षण या कार्यशाळेस शहरातील शिक्षकांचा प्रतिसाद

0
97

स्व.अशोकभाऊ फिरोदिया यांच्या जयंतीनिमित्तचा उपक्रम

कोरोनाने शिक्षण क्षेत्रासह जग बदलले – सर्जेराव निमसे

 

अहमदनगर प्रतिनिधी – कोरोनाने शिक्षण क्षेत्रासह जग बदलले. कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना नव-नवीन शिकण्यास मिळाले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाळा ऑनलाईन झाली. येणारी आपत्ती संधी देखील घेऊन येत असते. संकटांचा सकारात्मक पध्दतीने सामना करण्याचे आवाहन लखनऊ व नांदेड विद्यापिठाचे माजी कुलगुरु सर्जेराव निमसे यांनी केले.

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी यांच्या संयुक्त विद्यमाने अ.ए.सो. चे माजी कार्यवाह स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी कोविड काळानंतरचे शिक्षण या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना निमसे बोलत होते.

या कार्यक्रमास अ.ए.सो. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, नियामक मंडळाच्या सदस्या सुनंदाताई भालेराव, रोटरी प्रियदर्शनीच्या शशी झंवर, लिटरसी सचिव प्रतिभाताई धूत, सचिव देविका रेळे, कुंदा हळबे, गिता गिल्डा, पांडे मॅडम यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना निमसे यांनी कोरोनानंतरची शिक्षण पध्दतीला सकारात्मकपणे सामोरे जाण्याचे शिक्षकांना आवाहन केले. तर कार्यशाळेस उपस्थित असलेले शाळांचे अध्यापक, मुख्याध्यापक यांनी उपस्थित केलेले विविध प्रश्‍न व शंकांचे निरसन त्यांनी केले. प्रारंभी स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत गीताद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

छायाताई फिरोदिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक उल्हास दुगड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रतिभाताई धूत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षा शशी झंवर यांनी रोटरीच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या अध्यापिका अपर्णा हतवळणे व अर्चना मुंडीवले यांनी केले. रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या कुसुम मावची यांनी आभार मानले. कोरोना नियमांचे पालन करुन ही कार्यशाळा पार पडली. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, अध्यापक वर्ग व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here