अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची खर्चाची प्रथम तपासणी संपन्न
अहमदनगर दि. ४ मे (जि.मा.का.) ३७- अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे खर्च निरीक्षक शक्ती सिंग यांच्या उपस्थितीत दि.03 मे रोजी पार पडली. या तपासणीस २५ उमेदवारांपैकी २१ उमेदवार/प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच उमाशंकर श्यामबाबू यादव, अमोल विलास पाचुंदकर, रावसाहेब शंकर काळे व दिलीप कोंडीबा खेडकर हे 4 उमेदवार अनुपस्थित असल्यामुळे त्यांना मा.भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याद्वारे नोटीस देण्यात आलेली आहे.
निरीक्षक शक्ती सिंग यांनी स्वतः सर्व उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्याची तपासणी केली. प्रथम तपासणीनंतर उमेदवारांच्या खर्चाचे दैनंदिन नोंदवही मा. निवडणूक आयोग यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. दुसरी तपासणी 7 मे रोजी पार पडणार आहे. या तपासणीसाठी सर्व उमेदवारांनी त्यांच्या खर्च नोंदवही व इतर अनुषंगिक कागदपत्रे यासह उपस्थित राहावे, असे आवाहन खर्च निरीक्षक शक्ती सिंग यांनी केले आहे.
प्रथम तपासणी साठी नोडल अधिकारी ( खर्च) शैलेश मोरे, सहाय्यक खर्च निरीक्षक अजय कुमार, सहाय्यक समन्वय अधिकारी (खर्च)विशाल पवार,भाग्यश्री जाधव,राजू लाकूडझोडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.