तीन खडी क्रेशर चालकांना नोटीसा;शेतकर्यांच्या आंदोलनाला यश;नुकसान भरपाईसाठी शेतकर्यांचा पाठपुरावा सुरु
अहमदनगर (प्रतिनिधी)- खडी क्रेशरच्या धुळीने शेतीचे नुकसान होत असल्याने अरणगाव व खंडाळा (ता. नगर) हद्दीतील आखेर तीन खडी क्रेशर बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहे. तर तीन खडी क्रेशरच्या नोंदणीमध्ये त्रुटी असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. खडी क्रेशरचे परवाने रद्द करावे व नवीन परवाने देणे थांबविण्याच्या मागणीसाठी स्थानिक शेतकर्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश आले आहे.
खडी क्रेशरच्या धुळीचा त्रास होत असल्याने स्थानिक शेतकर्यांनी सन 2020 पासून पाठपुरावा सुरु ठेवला होता. रास्ता रोको आंदोलन, निवेदन व प्रदूषण नियंत्रण मंडळाशी पाठपुरावा सुरु होता. सदर खडी क्रेशर बंद होण्यासाठी स्वातंत्र्य दिनी खडी क्रेशर विरोधी शेतकरी कृती समितीच्या वतीने उपोषण करण्यात आले. या उपोषणास भाकप, किसान सभा, आयटक कामगार संघटना व आरपीआयने पाठिंबा दिला होता.
आंदोलकांवर धनदांडगे खडी क्रेशर चालकांनी राजकीय दबाव आनण्याचा प्रयत्न केला. मात्र ठोस आश्वासन मिळत नाही, तो पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा शेतकर्यांनी घेतला होता. तीन दिवस चाललेल्या या उपोषणाची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिक विभागीय प्रादेशिक अधिकारी डॉ.पी. एम. जोशी यांनी आदेश देऊन श्रीराम स्टोन क्रेशर, म्हस्के-साळुंके कॉन्ट्रॅक्टर, माहेश्वरी हे तीन स्टोन क्रेशर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर नोंदणीनंतर त्रुटी असणार्या भारत स्टोन क्रेशर, श्री आदिशक्ती, भैरवनाथ स्टोन क्रेशर या तीन खडी क्रेशर चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला आहे.
शेतकर्यांच्या या आंदोलनासाठी नारायण पवार, अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, सतीश पवार, बबन शिंदे, भानुदास गव्हाणे, अंबादास कल्हापूरे, शिवाजी खंडागळे, संदीप साखरे, परशुराम पवार, संदीप खंडागळे, अंजनाबाई पवार, भिमाबाई साखरे, सखुबाई पवार, केशरबाई गव्हाणे, ललीता शिंदे यांनी पुढाकार घेतला होता.
महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष नामदेवराव गावडे, राज्य सचिव तुकाराम भस्मे व भाकपचे राज्य सहसचिव अॅड. कॉ. सुभाष लांडे यांनी शेतकर्यांना आंदोलन करुन न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त करुन, नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा सुरु ठेवण्याचे सांगितले आहे.
——————————
खडी क्रेशर चालकांना राजकीय पुढार्यांना आश्रय असून, धनदांगडे खडी क्रेशर चालक शेतकर्यांची मुस्कटदाबी करत आहे. धुळीमुळे जवळपास नव्वद एकर शेतीचे नुकसान झाले आहे. शेती नापीक होऊन शेतकर्यांचे वार्षिक उत्पन्न घटले आहे. खडी क्रेशर चालकांकडून शेतकर्यांना महिन्यापोटी नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. आंदोलनात शेतकर्यांचे नेतृत्व करणारे नारायण पवार यांच्या विरोधात खोटे आरोप करुन सोशल मिडीयात चुकीचा संदेश पसरवून हे आंदोलन दडपण्याचे षडयंत्र खडी क्रेशर चालकांनी चालवला आहे. – अॅड.कॉ. सुधीर टोकेकर