आजी-आजोबा झालेल्या भिंगार हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा भरली शाळा
45 वर्षानंतर शालेय मित्र-मैत्रिणी एकवटले
शालेय जीवनातील जुन्या आठवणीत झाले रममाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- तब्बल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार हायस्कूल मधील सन 1979 एस.एस.सी. बॅचच्या माजी विद्यार्थी नुकतेच एकत्र आले. 45 वर्षानंतर आजी-अजोबा झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा दिला. उतारवयाकडे वाटचाल करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या मित्रांबरोबर एकच धमाल केली. तर आयुष्य घडविणाऱ्या माजी शिक्षकांसमोर नतमस्तक झाले.
भिंगार हायस्कूलच्या सन 1979 मधील एस.एस.सी. बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. शाळेच्या प्रांगणात एकत्र येवून माजी विद्यार्थ्यांनी वृक्षरोपण केले. राज्याच्या विविध भागातून माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी कार्यक्रमासाठी हजर होते. भिंगार हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मनिषा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास जे.बी. पोळ, विजय मुळे, प्रकाश डेरे, निर्मला होनराव, कल्पलता कुकडे, माधुरी दंडकटे, मिनाक्षी शिरसाठ, पद्माकर देशपांडे, आप्पासाहेब गावडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
माजी शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना जणू वर्गच भरविला होता. 45 वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र आलेल्या जुन्या मित्रांना ओळखणेही अवघड झाले होते. या जुन्या सवंगडींनी एकत्र येत शालेय जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. आपल्या लाडक्या शिक्षकांशी देखील विद्यार्थ्यांनी मनमुराद गप्पा मारुन जुन्या आठवणी सांगितल्या.
उपस्थित मित्रांनी आपल्या भावना व्यक्त करुन जुन्या चांगल्या-वाईट आठवणीचा इतिहास मांडताना सर्वच भारावले. यावेळी विद्यार्थ्यांचे तास होवून मधली सुट्टी देखील झाली. तर संगीत खुर्ची, अंताक्षरी आदी मनोरंजनात्मक खेळात माजी विद्यार्थी रंगले होते. यावेळी उपस्थित आजी-माजी शिक्षकांचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. उपस्थित माजी शिक्षकांनी 45 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांसह एकत्र आल्याचे कौतुक करुन जुन्या आठवणी सांगितल्या. दिवसभर भिंगार हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम रंगला होता. या स्नेह मेळाव्याचे आयोजन माजी विद्यार्थी धनंजय कार्लेकर, राजश्री पारखे, सुनील माळगे, श्रीराम प्रमुणे, दत्तात्रय पानमळकर, पांडुरंग गव्हाणकर यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशालता बेरड यांनी केले.