जामखेड प्रतिनिधी – नासीर पठाण
तालुक्यातील रत्नापूर येथील खासगी सावकाराच्या घरावर सहकार विभागाने काल दि. ३० रोजी छापा टाकून खाजगी सावकारकी संदर्भात आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाजगी सावकारकी संदर्भात जामखेड पोलिस स्टेशनला आठ दिवसांत तीन गुन्हे तर सहकार विभागाकडूनही एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे एकुण आठ खाजगी सावकाराविरोधात आठ दिवसांत चार गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत.आणखी मोठे मासे गळाला कधी लागणार अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील बबन श्रीराम वराट याचे विरूद्ध जिल्हा उपनिबंधक नगर कार्यालयाकडे अवैध सावकारकी करत असल्याची तक्रार दाखल झाली होती.
त्यानुसार जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी कारवाई करणेकामी जामखेड येथिल साहाय्यक निबंध देविदास घोडेचोर,सहकार अधिकारी साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बबन वराट याच्या राहत्या घरावर पोलीस बंदोबस्तासह धाड टाकून घराची झडती घेतली या झडतीमध्ये खाजगी सावकारकी संदर्भात आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आले त्यानुसार वराट याच्या विरुद्ध अवैध सावकारकी अधिनियम २०१४ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्ह्यातील अवैध सावकारांच्या जाचात त्रस्त व पीडित नागरिकांनी स्वतः होऊन पुराव्या सह तक्रार द्यावी तक्रारीची दखल घेऊन खाजगी सावकाराविरोधात कारवाई करण्यात येईल असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नगर दिग्विजय आहेर यांनी केले आहे.