‘आम आदमी पार्टी’च्या लढाईचे यश : आता गुप्तचर चौकशीसाठी पाठपुरावा करणार
नेवासा (प्रतिनिधी) – नैसर्गिक आपत्ती मदत निधी खात्याच्या चेकवर खाडाखोड करुन तब्बल 16 लाखांवर रकमेचा अपहार केल्याप्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादीवरुन देडगांवचा कोतवाल अविनाश हिवाळे याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने नेवासा टाइम्स तसेच आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्यास यश आले आहे.
याबाबत नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाकडून नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदतीचे धनादेश संबंधित गावांचे कामगार तलाठी तसेच कोतवालांमार्फत वितरित केले जातात. तालुक्यातील देडगांव येथील लाभार्थ्यांच्या मदतीचे चेक तेथील कोतवाल अविनाश हिवाळे यांच्यामार्फत पाठवण्यात आले होते. मात्र सन 2019 पासून सदर हिवाळे यांनी या मदतीच्या चेकच्या नाव, रक्कम व तारखेत खाडाखोड करुन प्रत्यक्षात शेकडा, हजारांत असलेली मदतीची रक्कम खाडाखोड करुन काही लाखांत करुन ती खऱ्या लाभार्थ्यांऐवजी त्यांच्याही नावांत खाडाखोड करुन स्वतःच्या आप्त स्वकियांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची करामत त्यांनी केल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे चेकवरील ही खाडाखोड अधिकृत दिसण्यासाठी तहसीलदारांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करुन 2019 पासून वेळोवेळी मिळून हिवाळे याने शासनाच्या नैसर्गिक आपत्ती मदत निधी खात्यातील तब्बल 16 लाख 14 हजार 784 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप सुराणा यांनी केला आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर हिवाळे याने हा प्रकार स्वतः केल्याची कबुली देत अपहारित रकमेचा भरणा करण्याची तयारी दाखवून त्यासाठी दोन दिवसांची मुदत मागून घेतल्याचेही त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
परंतु या मुदतीत केवळ 8 लाख 90 हजार 103 रुपयांचा भरणा करुन उर्वरित 7 लाख 24 हजार 681 रुपयांचा भरणा करण्यास टाळाटाळ केल्याने तहसीलदार सुराणा यांच्या कायदेशीर फिर्यादीवरुन शासनाच्या निधीचा अपहार करुन फसवणूक व नुकसान केल्याप्रकरणी नेवासा पोलीसांनी अविनाश हिवाळे याच्या विरोधात भादवि कलम 408, 409, 420, 465, 467, 468, 471, 473, 477 (अ), 484 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय करे करत आहेत.
दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्याला मोठा कालावधी उलटून जाऊनही संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे टाळून त्याला बेकायदेशीररित्या बचावाची संधी दिली जात असल्याचे समोर आल्यानंतर जिल्ह्याच्या महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आम आदमी पार्टीनेही यासंदर्भात महसूलच्या वरीष्ठांसह पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखा तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करुन पाठपुरावा केला.त्यामुळेच अखेर नेवासा तहसीलदारांना याप्रकरणी गुन्हा दाखल करावा लागल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.
गुप्तचर चौकशीसाठी आग्रही –
नैसर्गिक आपत्ती मदत निधी खात्यातील शासकीय रकमेच्या अपहारप्रकरणी नेवासा पोलीसांत गुन्हा दाखल झाल्याने या नाट्याचा केवळ पहिला अंक पूर्ण झाला आहे.कोतवाल पदावरील कर्मचारी एकटा एवढे मोठे धाडस करुच शकत नाही.यामागे नेवासा तहसीलमधील मोठी साखळी असून या लोकांनी यापेक्षाही अधिक भयंकर कारनामे केलेले आहेत.आर्थिक अफरातफरीबरोबरच भूमाफीयांच्या तालावर महारवतन, देवस्थान इनाम, वनजमिन, प्रकल्पग्रस्त पुनर्वसन क्षेत्राच्या मूळ शासकीय रेकॉर्डमध्ये बेकायदेशीर बदल केल्याचे पुरावे हाती आले आहेत. याप्रकरणासह हे सर्व पुरावे सी.आय.डी., सी.बी.आय., ईडी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवून त्याचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत पाठपुरावा करणार आहोत.
(प्रवीण तिरोडकर, सचिव, आम आदमी पार्टी नेवासा)