त्यांच्या आजोबांनी भुईदंडाने पाणी आणण्याच्या भूलथापा देऊन फसवले
आ.नीलेश लंके यांचा विखेंवर हल्लाबोल
टाकळीढोकेश्वर येथे जनसंवाद यात्रा
पारनेर,(प्रतिनिधी) :
गेली पन्नास वर्षे विखे परिवाराने संपूर्ण नगर जिल्ह्याला झुलवत ठेवले. पारनेरसह नगर, पाथर्डी तालुक्यात कुकडी प्रकल्पाचे पाणी भुईदंडाने आणू अशा वल्गना खा.सुजय विखे यांचे आजोबा माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी चाळीस वर्षे केल्या.मात्र ते साध्या नळानेही पाणी आणू शकले नाहीत. अशी घणाघाती टीका आमदार नीलेश लंके यांनी केली. टाकळी ढोकेश्वर येथे जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.
टाकळीढोकेश्वरच्या सरपंच अरूणा खिलारी अध्यक्षस्थानी होत्या. आ. लंके म्हणाले की,महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर आपल्या मतदारसंघाला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला.आजही सुमारे साडेतिनशे कोटी रूपयांचा निधी रोखला आहे. विरोधकांनी हे लक्षात ठेवावे,मी सोपा नाही,लोकसभेचे मतदान झाल्यानंतर रोखलेला निधी मिळालेला असेल.असे आ.लंके यांनी ठणकावून सांगितले.
मला विधानसभेत पाठविल्यानंतर सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. साडेचार वर्षांच्या कालखंडात सर्वाचे समाधान करू शकलो नसलो तरी संपूर्ण कार्यकाळात रात्रंदिवस परीश्रम घेतले.मतदार संघाला न्याय देण्यासाठी अथक आणि प्रामणिक प्रयत्न केले. प्रत्येक गावात किमान एक कोटी रूपयांचा निधी देण्याचा प्रयत्न केला. विधानसभेची घडी बसलेली असतानाही लोकसभेसाठी विधानसभेचा राजीनामा दिला.आपण मांडलेला डाव मोडला.आता डाव पुन्हा सावरायचा असल्याचे सांगत भावनिक आवाहन लंके यांनी केले.
तालुक्यातील काही असंतुष्ट आत्मे लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आपले भवितव्य आपल्याच हातात आहे. माझा तुमच्यावर व तुमचा माझ्यावर अधिकार आहे.लोकसभा निवडणुकीत आपण झेंडा लावणारच.
आपले नाव देशात होणार आहे. धोका पत्करून आपण पुढे जात आहोत. समोरचा कडा पार करून झेंडा रोवायचा आहे.तालुक्यातील जनतेच्या हाती मताधिक्य आहे. किमान एक लाखांची आघाडी मिळाली पाहिजे. विरोधक इतर तालुक्यात जाऊन तालुक्यात लंके यांना लिड मिळणार नाही असा गैरसमज पसरवत आहेत कारण इतर तालुक्यातही त्यांना प्रतिसाद मिळत नाही असे आ.नीलेश लंके म्हणाले.
चौकट
विखे यांचे सुडाचे राजकारण
विखे परिवाराने पारनेर तालुक्यातील पाच कुटूंबे सोडून इतर कुुणाला ताकद दिली का ? मी कोणत्याही गावात गेलो तरी शंभर दोनशे जिवाभावाची माणसे गोळा होतात. मी त्यांना थेट नावाने ओळखतो. कोणी काम घेऊन आले तर तुझ्या गावाचा पुढारी घेऊन ये, तू कोणत्या पक्षाचा आहे याची कधीही विचारणा केली नाही. प्रत्येकास मदत केली. कोणास त्रास होईल असे कधी केले नाही. माझ्यामुळे कोणाचे आयुष्य बरबाद होईल असे कृत्य मी कधीही केले नसल्याचे सांंगत विखे हे सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप लंके यांनी केला.
चौकट
पारनेरात भाजपा नगण्य
विधानसभेला शिवसेनेविरोधात आपण निवडणूक लढविली मात्र निवडणूकीनंतर मी कधीही शिवसैनिकांना त्रास देण्याची भूमीका घेतली नाही. या निवडणूकीत आपण महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, काँग्रेससोबत आहोत. आपल्या घरात लग्न आहे. कार्यकर्त्यांनी गावात जाऊन आपल्याला विरोध करणारांना चार लोकांच्या नादी लागून आपल्या तालुक्यातील व्यक्तीला विरोध करू नका असे त्यांना समजावून सांगा.तालुक्यात गेल्या पंधरा वीस वर्षांपासून राष्ट्रवादी व शिवसेना या दोनच पक्षांची ताकद आहे. तिसऱ्या पक्षाची ताकद नगण्य आहे, आपली भूमीका सर्वांपर्यंत पोहचवा, आपण मोठी आघाडी घेणार असल्याचे लंके म्हणाले.
चौकट
ते कार्यकर्त्यांचा वापर कढीपत्त्या सारखा करतात
निवडणूकीत ते कार्यकर्त्यांचा,मतदरांचा ‘युज अॅंण्ड थ्रो’, कढीपत्त्या सारखा वापर करतात. काल जातेगांव घाटातून जात असताना वाशिम येथील प्रवाशांचे वाहन बंद पडल्याने ते रस्त्यावर उभे होते. त्या प्रवाशांना मदत करून आम्ही पुढे गेलो. माझ्या जागेवर खासदार असते तर दुसरीकडे तोंड करून ते निघून गेले असते असे लंके म्हणाले.
चौकट
आता हे पार्सल उत्तरेत पाठवायचे आहे
पैशांचा पाउस पाडणारे, वाळू चोर, लाकूड चोर खा. डॉ. विखे यांना चालतात, दुसरीकडे नीलेश लंके यांच्या पाठीशी उभे राहणा-यांना ते गुुंड म्हणतात. शिक्षकांना निलंबित करतात. तालुक्यातील मतदारांनी आता हे पार्सल उत्तरेत पाठवायचे आहे.
अरूणा खिलारी
सरपंच, टाकळीढोकेश्वर
चौकट
बदला घेण्याची वेळ आलीय
स्व बाळासाहेब विखे यांना पारनेर तालुक्याने खासदार केले. गेल्या पन्नास वर्षात विखे कुटूंबाने काय काम केले ? इतक्या वर्षात त्यांच्यासोबत पाच सहा घराणे सोडली तर कोणीही नाही. ज्यांनी जिल्हयाला त्रास दिला त्याचा बदला घेण्याची आता वेळ आली आहे.
अॅड राहुल झावरे
- Advertisement -