अहमदनगर प्रतिनिधी – शासनातर्फे उपेक्षित घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. असे आवाहन ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री.हसन मुश्रीफ यांनी केले.

पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण ग्राम विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री श्री.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. आमदार निलेश लंके, सरपंच गणेश मापारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यावेळी बोलताना म्हणाले, पारनेर तालुक्यातील रस्ते आणि कान्हूर पठार भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यात येईल. कोरोनाकाळात तालुक्यातील पदाधिकारी आणि प्रशासनाने केलेल्या कार्याचे कौतुक त्यांनी केले. सर्व ग्रामस्थांनी कोरोना लसीकरण करावे आणि कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
कामगार विभाग, ग्राम विकास विभाग, तसेच सामाजिक न्याय विभागाच्या लोक कल्याणकारी योजनांचा लाभ उपेक्षितांना मिळवून द्यावा.असे आवाहन ही त्यांनी केले.
आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यात सहकाराचे जाळे विणले असल्याचे आणि बचतीची शिकवण दिली असल्याचे सांगितले. पिण्याच्या पाण्याचे लाईट बिल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते होते.