एकपात्री प्रयोगातून मतदार जागृती व स्वच्छतेचे प्रबोधन

0
99

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वच्छता ही निरोगी जीवनाची व समृद्धीची गुरुकिल्ली आहे. समाजामध्ये पसरणारे विविध आजारांचे मुख्य कारण अस्वच्छता आहे. दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे जीव-जंतू आपल्या अवतीभवती असतात, त्याचा थेट परिणाम मानवी शरीरावर व आरोग्यावर होत असतो. त्याचा नायनाट करण्यासाठी स्वच्छता पाळणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मनुष्यबळ विकास केंद्र, कासाचे राज्य प्रकल्प अधिकारी सुनील गायकवाड यांनी केले.
अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, जय युवा अकॅडमी व मनुष्यबळ विकास केंद्राच्या (कासा) वतीने नगर-दौंड रस्त्यावरील कासा संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रात स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता अभियान व मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी गायकवाड बोलत होते.

याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. सुनिल तोडकर, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, संध्या पावसे-जोशी, शाहीर कान्हू सुंबे, डॉ. अमोल बागुल, डॉ. संतोष गिर्‍हे, आरती शिंदे, निकिता वाघचौरे, मंगल सोनवणे, नयना बनकर, पोपट बनकर, वंदना थोरवे, जय युवा संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, कासाचे समन्वयक प्रभाकर दळवी, अस्मिता ढोले, मनोहर मिसाळ, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.

प्रारंभी संध्या जोशी यांनी स्वच्छता जीवनाचा अविभाज्य घटक आहे. स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. आपले घर, अंगण, आपला परिसर, सार्वजनिक जागा, गाव स्वच्छ ठेवल्यास रोगराई होणार नसल्याचा संदेश देणारी एकपात्री प्रयोग सादर करून परिसरामध्ये जनजागृती केली. लोककलावंत शाहीर कान्हू सुंबे, कारभारी वाजे व त्यांच्या सहकार्यांनी लोक गीतांच्या माध्यमातून मतदार जागृती व स्वच्छता अभियानाबाबत प्रबोधन केले. रस्त्यावरील तृतीयपंथीयांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवत प्रबोधन केले.

डॉ.अमोल बागुल यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना याचबरोबर मतदान कार्ड देखील महत्त्वाचे आहे. देशाच्या विकासामध्ये सर्वात प्रभावी अशी ताकद युवकांमध्ये आहे. तो युवावर्ग जागृक झाल्यास क्रांती व परिवर्तन घडू शकते. लोकशाहीच्या जागर मध्ये युवकांचा सहभाग मतदार शंभर टक्के होण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले यांनी गेल्या दोन दशकापासून जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य संलग्नित सामाजिक संस्था शासनाच्या विविध प्रकल्पात व योजनांमध्ये कृतिशीलपणे सहभाग घेऊन जनजागृतीचे कार्य करीत आहे. शासनाच्या अनेक योजना तळागाळा पर्यंत पोहचविण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले आहे. या स्वयंसेवी संस्थांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांचे स्वागत पुस्तके देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. महेश शिंदे यांनी केले. आभार आरती शिंदे यांनी मांनले. या कार्यक्रमासाठी जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here