नेवासा फाटा :- न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यस्तरिय संपाला केंद्रीय पत्रकार संघाने पाठींबा दिला असून राज्य सरकार तसेच एस.टी. प्रशासनाने यावर सन्मान्य तोडगा काढून कर्मचारी व प्रवाशांना त्वरीत दिलासा देण्याची मागणी केली आहे.
दि.२८ ऑक्टोबरपासून एस.टी. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी राज्यस्तरिय बेमुदत संप जाहीर केला असून यामध्ये नेवासा आगाराच्या कर्मचाऱ्यांनीही आज पासून शंभर टक्के बंद पाळला आहे. अनेक वर्षांपासून एस.टी.चे कर्मचारी महाराष्ट्र शासनाला सेवा देत असतानाही त्यांच्यावर नेहमीच अन्याय केला जात असल्याचा एस.टी. कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना अतिशय तुटपुंजा मोबदला दिला जात असून त्यांचे करार देखील वेळेत पूर्ण होत नसल्याने त्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याची संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. असंख्य एस.टी. कर्मचाऱ्यांनी यापूर्वी दुर्दैवी आत्महत्या केली होती त्यांनी यानिमित्ताने संबंधितांचे लक्ष वेधले असून तरीही राज्य शासनाने आतापर्यंत त्याची दखल घेतली नसल्याची हताश भावना कर्मचारी व्यक्त करताना दिसून येत आहेत.
जर शासनावर अतिरिक्त भार होत असेल तर फक्त चालक आणि वाहक जे रात्रंदिवस फिल्डवर काम करतात त्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा मिळून त्यांचे शासकिय सेवेत विलीनीकरण करा, तसेच रखडलेला करार त्वरित करावा अशा अनेक न्याय्य मागण्यांसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीमध्ये हा संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
शासन या गंभीर प्रश्नाची दखल घेत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. या एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरिय संपाला आता केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांच्या आदेशावरुन राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड, अहमदनगर जिल्हाध्यक्ष रेवणनाथ नजन, नेवासा तालुकाध्यक्ष प्रवीण तिरोडकर यांनी लेखी पत्र देऊन पाठिंबा जाहीर केला आहे.
तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून केंद्रीय पत्रकार संघाचे पत्रकार एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने खंबीर उभे राहतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
प्रशासनाकडून मुस्कटदाबी –
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरिय संपात आजपासून सक्रिय सहभागी झालेल्या नेवासा आगारातील कर्मचाऱ्यांना नेवासा आगार प्रशासनाकडून ‘कामावर हजर व्हा, अन्यथा सेवेतून कायमस्वरुपी बडतर्फ करु’ अशी नोटीस काढण्यात आल्याने त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. आमच्या जीवन मरणाची लढाई सुरु असताना अशा प्रकारे नोटीस काढून एस.टी.चे नेवासा आगार प्रशासन कर्मचाऱ्यांची एकप्रकारे मुस्कटदाबी करुन आवाज दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा पत्रकारांच्या वैचारिक चळवळीतून महाराष्ट्रभर आंदोलन करू – संदिप कसालकर, राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय पत्रकार संघ
ना.सतेज पाटील यांना भेटणार – गायकवाड
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्याय्य असल्याने त्याच्या पुर्ततेसाठी त्यांनी उपसलेले संपाचे हत्यार घटनात्मक आहे. त्यामुळे एस.टी. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांवर सुरु असलेली दडपशाही निषेधार्ह आहे.एस.टी.च्या नेवासा आगार प्रशासनाच्या या दमननिती विरोधात परिवहन राज्यमंत्री ना.सतेज पाटील यांची भेट घेऊन दाद मागणार आहोत. – कमलेश गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष, केंद्रीय पत्रकार संघ
श्री. राजू साहेबराव दळवी
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्याय्य असल्याने त्याच्या पुर्ततेसाठी त्यांनी उपसलेले संपाचे हत्यार घटनात्मक आहे. त्यामुळे एस.टी. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांवर सुरु असलेली दडपशाही निषेधार्ह आहे.
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा पत्रकारांच्या वैचारिक चळवळीतून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल – श्री. राजू सा. दळवी महाराष्ट्र सचिव , केंद्रीय पत्रकार संघ