सरपंच परिषदेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी
सन्मानाने जगण्यासाठी एस.टी. कर्मचार्यांचा प्रश्न तात्काळ सोडवावा – आबासाहेब सोनवणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या एस.टी. कर्मचार्यांच्या आंदोलनास सरपंच परिषदेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. रविवारी सरपंच परिषदेच्या पदाधिकार्यांनी शहरातील एस.टी. महामंडळाचे सर्जेपुरा येथील विभागीय कार्यालय व तारकपूर बस स्थानक आगार येथे सुरु असलेल्या आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा दिला.
सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, नगर तालुका सचिव पै. नाना डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पठारे, महिला जिल्हा उपाध्यक्षा प्रियंका लामखडे, नगर तालुका महिला अध्यक्षा अॅड. अनुजा काटे, निलम दुबे, हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, मुकुंद दुबे यांनी एस.टी. कर्मचार्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते.
जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी महागाईच्या काळात अत्यंत कमी वेतनात एस.टी. महामंडळाचे कर्मचारी सेवा देत आहे. महामंडळाच्या ३८ कर्मचार्यांनी निराशेपोटी आत्महत्या केल्या आहेत.त्यांना राज्य शासनाचा दर्जा देऊन सन्मानाने जगण्यासाठी सरकारने त्यांचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे त्यांनी सांगितले.
नगर तालुका सचिव पै. नाना डोंगरे म्हणाले की, अन्यायाविरोधात एस.टी. कर्मचार्यांनी आवाज उठवला आहे. सर्व कर्मचारी न्याय, हक्कासाठी आंदोलन करीत आहे. शासनाने त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष न करता त्यांचे प्रश्न निकाली काढण्याची गरज आहे. कर्मचार्यांचे आंदोलन दडपण्यासाठी त्यांच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न केला जात असून, कर्मचार्यांच्या आंदोलनास सरपंच परिषदेचा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डी.के. येणारे यांना आंदोलनास सरपंच परिषदेच्या पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळास राज्य शासनाचा दर्जा द्यावा, एस.टी. महामंडळाच्या कर्मचार्यांना राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन मिळावे, आत्महत्या केलेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये मदत व कुटुंबाच्या सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.