एस.टी.कर्मचार्यांच्या प्रश्नावर सरकारला तोडगा काढण्यास भाग पाडू – भैय्या गंधे
अहमदनगर प्रतिनिधी – गेल्या काही वर्षांपासून एस.टी. कर्मचार्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत, परंतु हे आघाडी शासन त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने एस.टी. कर्मचार्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होऊ लागल्याने अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. ही सरकारच्यादृष्टीने लाजीरवाणी बाब आहे. हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून उन,वार, पाऊस अशा अत्यंत कठिण परिस्थितीत आपली सेवा बजावत आहेत.
परंतु त्यांच्या रास्त मागण्यापूर्ण होत नाही, हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. त्यामुळे या कर्मचार्यांनी पुकारलेल्या आंदोलनास भाजपाचा संपूर्ण पाठिंबा असून, त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी भाजपाही आंदोलकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. याबाबत आपण स्वत: विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस व वरिष्ठांशी बोललो असून, या प्रश्नावर सरकारला तोडगा काढण्यास भाग पाडू, असे आश्वासन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी दिले.
राज्यातील एस.टी. कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात बेमुदत आंदोलन पुकारले आहे. नगरमध्ये तारकपुर डेपो येथे कर्मचार्यांनी सुरु केलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यात आला.
याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, अॅड.विवेक नाईक, तुषार पोटे, सुमित बटूळे, मनसेचे नितीन भुतारे, बाळासाहेब पाटोळे, संजय देशपांडे, शितल भिंगारदिवे, सुरज भंडारे, जया वाघ, राम जाधव, एस.के.गाडेकर, तेजश्री पुंड, महेश म्हस्के, ज्ञानदेव जाधव, बी.आर.साळवे, पी.बी.सुरवसे, उमेश गलांडे, मिरा पवार, संजय काटकर आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी नितीन भुतारे म्हणाले, एस.टी. कर्मचार्यांनी प्रलंबित मागण्यासाठी वेळोवेळी सरकारला विविध आंदोलनाबाबत सुचित केले, परंतु राज्य सरकार त्यांच्या मागण्याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे कर्मचार्यांचा सहनशिलतेचा अंत झाला असून, त्यामुळे कर्मचारी आता आत्महत्या करत आहे. शासन असे किती बळी घेणार? असा सवाल करत एस.टी. कर्मचार्यांच्या प्रश्नांसंदर्भात मनसेही त्याच्या सोबत असल्याचे सांगितले.