ऑईल वेचक कष्टकऱ्यांचे पर्यावरण दिनी धरणे आंदोलन
पर्यावरण रक्षणाचे काम होत असताना देखील प्रशासकीय व्यवस्थेकडून अडवणुक
अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील काळे ऑइल वेचक कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर वापरलेले ऑईल वेचक कष्टकरी पंचायतचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष नितीन पवार यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. जिल्ह्याचे प्रतिनिधी विकास उडानशिवे यांनी ऑइल वेचक कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडून काळे ऑइल वेचक कष्टकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पर्यावरण दिनी 5 जून रोजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वानुमते जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्याचे जाहीर केले. यावेळी विजय नेटके, अशोक साबळे, बाबासाहेब सरोदे, संजय लोखंडे, अजय नेटके, विठ्ठल कांबळे, सुनील ससाणे आदी उपस्थित होते.
संघटनेचे सभासद असलेले शहरातील काळे ऑइल वेचक कष्टकरी वापरलेले ऑइल गोळा करण्याचे काम करतात. मोटरसायकल, मोटारी, ट्रक इत्यादी पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये वंगण ऑइल वापरले जाते. ठराविक किलोमीटर किंवा ठराविक कालावधी झाल्यावर हे ऑइल बदलावे लागते. या गाड्यांचे बदललेले ऑइल गॅरेज चालक एका ड्रम मध्ये गोळा करतात. ऑइल वेचक हे काळे ऑइल सायकल, मोटरसायकल, छोटे टेम्पो याद्वारे गॅरेज मधून गोळा करून पुनर्प्रक्रियेसाठी रिफायनिंग फॅक्टरी यांना देतात. आपल्या रोजी रोटीसाठी त्यांचे काम सुरु असून, ते एकप्रकारे पर्यावरण रक्षणही करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
काळे ऑइल हजारडस्ट म्हणजे धोकादायक कचरा या संज्ञेत येते. हे ऑइल जर पाण्यात गेलं तर पाणी प्रदूषित होते आणि जमिनीत हे ऑइल पसरल्यास जमीन नापीक होते. सभासदांच्या कामामुळे पर्यावरणाला असलेला धोका टळतो. या सर्व कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होण्याऐवजी त्यांना प्रशासकीय व्यवस्था आणि पोलिसांकडून विविध प्रकारे त्रास देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काळे ऑइलचा आणि खाद्य तेलाचा काही संबंध नसताना अन्नपुरवठा विभागही या कष्टकऱ्यांना त्रास देण्याचे काम करत आहे. जागतिक पर्यावरण दिनी स्वत:चा पोट भरुन पर्यावरण रक्षणाचे काम करणारे ऑइल वेचक कष्टकरी न्याय मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार आहेत.