कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
तालुक्यातील रजपूत मळा शिवारातील बुवासाहेब मळा याठिकाणी बिबट्याचा मृतदेह आढळला या मुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील रजपूत मळा शिवारातील व साहेब मला परिसरात परशुराम परदेशी हा शेतकरी शेतामध्ये जनावरांसाठी गवत व चारा देण्यासाठी आलेला असताना त्याला दुर्गंधीयुक्त वास आला. कशाचा वास येत आहे कोणते जनावर मेले की काय हे पाहण्यासाठी तो त्या दिशेने गेला असता समोर दिसलेले दृश्य पाहून परशुराम परदेशी हादरून गेला.
उसाच्या शेताच्या पलीकडे असणाऱ्या झुडपांमध्ये बिबट्या दिसला. मनामध्ये भीती होती तरीही धाडस करून परशुराम यांनी पुढे जाऊन पाहिले असता तो बिबट्या मेलेला असल्याचे लक्षात आले आणि त्याचीच दुर्गंधी पसरली होती.त्यांनी तात्काळ आसपासच्या शेतकऱ्यांना ही माहिती सांगितली.त्यानंतर मेलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी देखील आसपासच्या परिसरातून शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.
यानंतर या बाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.दरम्यान या परिसरामध्ये बिबट्याचा वावर यापूर्वी होता हे आता स्पष्ट झाले असून याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे शवविच्छेदन अहवालानंतर समजून येईल.